Monday, February 14, 2011

सातबारा कोरा करण्याची गरज

शेतीवरील सातबारा कोरा करण्याची गरज -चटप

(चंद्रपूर, ९ फेब्रुवारी)
                      शेतीवरील सर्व थकित कर्ज, कर व वीज बिल कायमचे संपून त्यांचा सातबारा बोजा विरहित कोरा करण्याची आणि त्यांची बाजारात व समाजात पत तयार करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथे शेतकरी संघटनेद्वारे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सेवा सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी व संचालकांच्या सत्कार सोहोळय़ात ते बोलत होते. यावेळी पूर्व विदर्भ शेतकरी संघटना बळीराज्य प्रमुख मधुकर हरणे, स्वभाप अध्यक्ष प्राचार्य अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, प्रभाकर ढवस, प्रवीण गुंडावार, संजय मुसळे, बंडू माणूसमारे, यादव चटप, मारोती लोहे, मुमताज अली, गणपत काळे, संतोष पटकोटवार, विजय आगलावे, दिलीप आस्वले, यादव पवार, अर्जुन कोटनाके, सरपंच गंगाधर पंधरे, लटारी ताजणे, सुधाकर कुसराम, खोके, संतोष पावडे, लोहे, लक्ष्मण राजुरकर, नागोबा टेकाम, देवतळे, विलास राजूरकर, आगलावे, लिलाधर चटप, यशवंत मुसळे, चरणदास कोट्टे, किसन अवताडे, चंद्रकांत झुरमुरे प्रामुख्याने उपस्थित होते. 
यावेळी बोलताना अ‍ॅड. चटप म्हणाले, शेतकरी व शेतीवर जगणारा गावातील प्रत्येक व्यक्ती हा माणूस आहे आणि त्याला माणूस म्हणून सन्मानाने व सुखाने जगता यावे, याकरिता शेती हा धंदा फायद्याचा होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शेतमाल उत्पादनाचा खर्च भरून निघेल, एवढा रास्त भाव मिळाला पाहिजे. मालक व मजुराला घामाचे दाम मिळाले पाहिजे, यासाठी कच्चा व पक्का माल देशांतर्गत व देशाबाहेरील कोणत्याही बाजारपेठेत जेथे जास्त किंमत मिळेल, तेथे विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तरच शेतकरी कर्ज, कर व वीज बिल भरू शकतील. आतापर्यंत रास्त भाव न मिळाल्यानेच शेतकऱ्यांचे शोषण होऊन आत्महत्याचे सत्र सुरू झाले. 
                                 यावेळी मधुकर हरणे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आवाळपूर, गाडेगाव, हिरापूर, सांगोडा, खिरडी या गावातील नवनिर्वाचित शेतकरी संघटना व स्वभापचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सेवा सहकारी सोसायटीचे संचालक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन प्रभाकर दिवे यांनी केले. सभेला कोरपना तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते शेतकरी, महिला, युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
(लोकसत्ता दि. १४-२-११ मधून साभार)

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून

आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे