Friday, December 5, 2014

मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन

  -  कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव
  -  शेतकर्‍यांना कर्ज आणि वीज बिलातून मुक्ती
  -  उत्पादनखर्च व त्यावर ५० टक्के नफ़्याच्या आधारावर शेतमालाचे भाव ठरवून वचनपूर्ती करा
  -  कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळून निर्यातबंदी हटवा

या प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात दिनांक ३० नोव्हेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फ़डणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, पुढारी, नवशक्ती, लोकशाही वार्ता, सकाळ, अ‍ॅग्रोवन  इत्यादी वृत्तपत्रात आलेल्या काही बातम्यांचा सारांश :

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

वरुणराजाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसल्यानंतर त्यांना सरकारकडून न्याय मिळवून देण्यासाठी राजकीय पक्ष आणि चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. त्यातून श्रेयासाठी धडपड सुरू झाली. 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज व वीज बिल माफी यासह कापूस, सोयाबीन आणि धानाच्या हमी भावात वाढ आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने रविवारी नागपुरात ठिय्या आंदोलन केले. त्यांनी आतापर्यंत केलेली आंदोलने आणि उठवलेला आवाज शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देणार ठरला. संघटनेचे अनेक शिलेदार बाहेर पडले. त्यांनाही बऱ्यापैकी यश येत असले तरी, शेतकऱ्यांचा राजकीय पक्षांपेक्षा संघटनेवर आजही विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी हाक देताच शेतकरी उभे राहतात. शेतकरी संघटनेसोबतच काँग्रेसनेही याच मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे. संघटनेने आंदोलन मुख्यमंत्री नागपुरात नसताना केले तर, काँग्रेसने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. नागपुरात संघटनेचे आंदोलन संपताच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. भीषण दुष्काळी स्थितीवर उपाययोजना, कापूस, ऊसाला भाव वाढवण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि जवखेडा हत्याकांडामुळे बिघडलेल्या सामाजिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. 

अन्य पक्षांनीही आंदोलनाचा इशारा दिला असल्याने इतरांना शेतकऱ्यांच्या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून संघटनेला आंदोलनाला सत्तारुढ पक्षाने तर बळ दिले नाही, अशी चर्चा या आंदोलनादरम्यान सुरू होती. सरकारला मदत करावी लागणार आहे. तसे संकतेही राज्यकर्त्यांनी दिले. केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद जोशी यांच्याशी आंदोलनापूर्वी चर्चा केली. त्यासाठी ते खास हेलिकॉप्टरने कसे आले, याचीही खसखस पिकली होती. 

Nagpur Thiyya


शेतकरी संघटनेचे आंदोलन असताना त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची राष्ट्रवादीला कोणती घाई झाली, असा सवाल संघटनेच्या एका नेत्याने केला. आतापर्यंत त्यांचीच सत्ता होती आणि मुख्य म्हणजे तिजोरी त्यांच्याकडे होती. त्यावेळी मदतीसाठी अशी घाई करण्यात आली नाही. आम्हाला श्रेय मिळू नये म्हणून विविध पक्षांचा हा खटाटोप असल्याची ​खंतही या नेत्याने व्यक्त केली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीने अचानक उडी घेतल्याने काँग्रेसनेही त्यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पहिल्या दिवशी विधानसभावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची टीम राज्यभर दौरे करून वातावरण निर्मिती करत आहे. त्यामुळे अल्पमताच्या सरकारला पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीला आताच पुळका कसा आला, असा सवाल एका नेत्याने केला.

Nagpur Thiyya

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने केलेल्या ठिय्या आंदोलन भलेही मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात असले तरी, ते मात्र राजधानी मुंबईत होते. संघटनेच्या यापूर्वीच्या आंदोलनाची धार लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व मार्ग सिल करून संपूर्ण धरमपेठ परिसरला वेढा दिला. त्यामुळे आंदोलनाची कल्पना नसलेल्या सर्वसामान्यांना नेमके काय चालले आहे, याची उत्सुकता होती.

शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले. आता काँग्रेसची निदर्शने व रस्ता रोको राहणार असल्याने ८ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते रविवारी मुंबई व राज्याच्या अन्य भागात होते. अर्थात संघटनेने आंदोलनाची घोषणा १०-१२ दिवसांपूर्वीच केली होती. त्यामुळे तर त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातच कार्यक्रम निश्चित करण्यात आले नाही, अशी चर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.

धरमपेठेतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. सकाळपासूनच बंदोबस्त लावण्यात आला. टाइम्स स्क्वेअर, कॉफी हाऊस चौक, झेंडा चौक आणि गिरीपेठेकडून येणाऱ्या मार्गांवर पोलिस ताफा होता. सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली. इतकेच नव्हे तर जत्थ्याने जाणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला. अन्य काही मार्गांवरून पादचारी आणि दुचाकींना प्रवेश देण्यात आला पण, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे तर कुणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळे त्रिकोणी पार्क परिसरात राहणाऱ्यांना बराच त्रास झाला. संघटनेने उपराजधानीत अनेक वर्षांनी मोठे आंदोलन केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्याची घोषणा केल्याने पोलिस यंत्रणेने कुठेही शिथिलता ठेवली नाही. सर्व बडे अधिकारी आंदोलन स्थळाच्या आसपास होते. सायंकाळी उशिरापर्यंत हा बंदोबस्त होता.

शेतकरी की विदर्भ

शेतकरी संघटनेच्या आंदोलनात विदर्भाचा गजर करण्यात आल्याने आंदोलन शेतकऱ्यांसाठी की विदर्भासाठी अशी चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये सुरू झाली. या आंदोलनात विदर्भाबाहेरील शेतकरीही सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन आंदोलन रेटावे, विदर्भामुळे संभ्रम होऊ शकतो, असाही चर्चेचा सूर होता.

आंदोलनस्थळीच ताब्यात घेतले

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जी. एस. कॉलेज समोरच ताब्यात घेतल्याचे दर्शवून नंतर मुक्तता केली. आंदोलनात सुमारे ७०० कार्यकर्ते होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले तर, यात ५ हजार कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा, संघटनेच्या नेत्यांनी केला.

Nagpur Thiyya
. नागपूर - प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापुढे आंदोलनात सहभागी होणे शक्‍य नसल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच गावात राहून गावबंदी आंदोलनाचा हिसका नेत्यांना दाखवा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी रविवारी (ता.30) केले. 

शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोरील आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांच्या निवासस्थानासमोरून मोर्चाची सुरवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठेतील निवासस्थानाकडे मोर्चेकरी जात असताना, पोलिसांनी लॉ कॉलेज चौकात मोर्चा अडविला. याच ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शरद जोशी यांनी प्रकृतीच्या कारणामुळे यापुढे पुण्यावरून नागपूरला येणे शक्‍य होणार नसल्याचे सांगितले. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटनेचे प्रभावी हत्यार असलेले "गावबंदी आंदोलन' करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

""गावाच्या वेशीवरच संबंधित पक्षाच्या नेत्याला अडवून त्याला शेतीविषयक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी काय केले? यावर बोलण्याचे सांगावे. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकरिता वेगवेगळी प्रश्‍नावली असेल,'' असेही ते म्हणाले. माजी आमदार वामनराव चटप, युवा आघाडीचे संजय कोल्हे, शेतकरी संघटनेचे वणी तालुकाध्यक्ष दशरथ पाटील, वेगळ्या विदर्भाचे समर्थक श्रीनिवास खांदेवाले, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सरोज काशीकर, माजी पोलिस महासंचालक चक्रवर्ती यांची या वेळी उपस्थिती होती. विरोधी पक्षात असताना भाजपने त्या वेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली तरीही शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, त्याकरिता भाजप नेत्यांनी आपला शब्द पाळावा, अशी अपेक्षा संजय कोल्हे यांनी व्यक्‍त केली. 

चौफेर घेराबंदी

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन असल्याने पोलिसांनी त्यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची घेराबंदी केली होती. धरमपेठ भागातील सर्वच रस्ते बंद केल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. 


Nagpur Thiyya

नागपूर, दि. 30 (वृत्तसंस्था) – राज्य सरकारची आणि कोणत्याही राजकीय पक्षांची शेतकर्यांच्या मागण्यापूर्ण करण्याची मानसिकता नसल्यामुळे आजपासून राजकीय पक्षांना गावबंदी आंदोलन करुन येणार्या नेत्यांना पहिले आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास भाग पाडा असे आवाहन शेतकरी संघटनचे नेते माजी खासदार शरद जोशी यांनी केले. शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करतांना ते बोलत होते. यावेळी बंदी हुकूम मोडून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी शरद जोशी, वामन चटप यांच्यासह कार्यकर्त्याना अटक करुन ताब्यात घेतले.

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या शेतकरी संघटनेच्या घोषनेनुसार आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आणि त्यासाठी मोर्चा काढण्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही आंदोलन करणारच अशी घोषणा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे आज या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्या आला होता. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गिरीपेठ परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यालयाजवळ एकत्र आले. तेथून शरद जोशी, वामनराव चटप, सरोज काशिकर, शैलेजा देशपांडे, प्रबीरकुमार चक्रवर्ती प्रभृती नेत्यांच्या नेतृत्वात मोच्याला सुरुवात झाली. मोच्—यात शेतक-यांच्या मागण्यांचे फलक आणि शेतकरी संघटनेचे झेंडे हातात घेवून सुमारे 3 हजार कार्यकर्ते पाळी चालत होते. गिरीपेठेतून निघालेला मोर्चा आरटीओ समोरुन लॉ-कॉलेज चौकाकडे पोहचला असतांना चौकाच्या अलिकडेच मोर्चा अडविण्यात आला. लॉ-कॉलेज चौकातून उच्च न्यायालय पश्चिम मार्गावरुन, कॉफी हाऊस चौक मार्गे फडणवीसांच्या निवास्थानाकडे जाण्याच्या आंदोलकांचा ईरादा पोलिसांनी लॉ-कॉलेज चौकात रोखून उधळून लावला. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याना मुख्यमंत्र्यांच्या घराकडे फटकता आले नाही.

लॉ-कॉलेज चौकात मोर्चाअडवल्यावर त्याच ठिकाणी आंदोलकांनी बसकण मारली आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. शेतक-यांना कर्जमुक्ती द्या, विज बिल मुक्ती मिळालीच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अश्या विविध घोषणांसह देवेंद्र हमसे डरता है, पोलिस को सामने करता है’ ही नवी घोषणाही लक्षवेधी ठरली होती. या ठिय्या आंदोलनाचे नंतर जाहिर सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना शरद जोशी म्हणालेकी, वारंवार आंदोलन करणे आपल्याला शक्य नाही मी प्रत्येक वेळी प्रकृत्री अस्वस्थेमुळे आंदोलनात सहभागी होवू शकत नाही. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी आता आपापल्या गावात जावून गावबंदी आंदोलन सुरु करावे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसे, शिवसेना या राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात आल्यानंतर त्यांना बंदी घालावी. त्यांचे भाषन जिथे असेल तिथे जावून त्यांना आपल्या प्रश्नांवी यादी देवून प्रश्नावी उत्तरे मागावी, समाधान कारक उत्तरे दिल्यास त्याला भाषण करु द्यावे अन्यथा गावबंदी घालावी अशी हाक शरद जोशी यांनी यावेळी दिली. यावेळी वामनराव चटप, सरोज काशिकर, शैला देशपांडे, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत हरणे पाटील, सुरेश शर्मा, राम नेवले, अरुण केदार, अर्थतज्ञ डॉ. श्रिनिवास खांदेवाले यांची यावेळी भाषणे झाली.

Nagpur Thiyya

नागपूर : शेतमालाचे भाव आणि शेतकर्‍यांच्या इतर समस्या यासंदर्भात देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ते विरोधी पक्षात असताना ज्या घोषणा केल्या होत्या त्या त्यांनी आता सत्ता आल्यावर पूर्ण कराव्यात. या नेत्यांनी बोलल्याप्रमाणे वागावे, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रविवारी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून केले. 
शेतकर्‍यांच्या प्रश्नांच्या संदर्भात रविवारी शेतकरी संघटनेने नागपुरात ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापुढे होणार होते. पण पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही हजारो शेतकरी या आंदोलनासाठी नागपुरात दाखल झाले होते. 
संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना, त्यांना अमरावती मार्गावरील वाणिज्य महाविद्यालयाजवळ रोखण्यात आले. तेथेच नंतर जाहीर सभा झाली. या सभेत संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यांच्या भाषणाचा सूर हा भाजप नेत्यांना त्यांच्या निवडणुकीच्या काळातील घोषणांची आठवण करून देणाराच होता.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल, धानाला तीन हजार रुपये व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, यासाठी आंदोलन केले होते. विधानसभेतही ही भूमिका मांडली होती; सोबतच कर्जमुक्ती व वीज बिलमुक्तीचीही भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा धरून शेतमालाचे भाव ठरविले जातील, असे अभिवचन देशाच्या जनतेला व शेतकर्‍यांना दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ही भूमिका विरोधी पक्षात असताना विधानसभेत आणि सभागृहाबाहेर मांडली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करावी, असे या नेत्यांचे म्हणणे होते. शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप म्हणाले की, आम्हाला वेगळे काहीही नको, फडणवीस यांनी त्यांच्या घोषणांची पूर्तता करावी, शेतमालाच्या संदर्भात जे ते बोलले होते तेच त्यांनी आता मुख्यमंत्री म्हणून करावे. याप्रसंगी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, दिनेश शर्मा, संजय कोल्हे, शैला देशपांडे, अनिल धनवंत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पी.के.बी. चक्रवर्ती, अँड. नंदा पराते आदींची भाषणे झाली. सभेचे संचालन राम नेवले यांनी केले. स्वतंत्र विदर्भाचाही नारा
■ शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात 'जय जवान जय किसान'सोबतच 'जय विदर्भ'च्याही घोषणा देण्यात आल्या. 
Nagpur Thiyya

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात आलेला शेतकरी संघटनेचा मोर्चा पोलिसांनी लॉ कॉलेज चौकाजवळील जी.एस. कॉलेजसमोर अडविला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.  आंदोलनकर्त्यांनी बळजबरी केलीच तर बळाचा वापर करून त्यांना अटक करण्यासाठी मोठय़ा संख्येने पोलीस दल व वाहनांचा ताफा सज्ज होता. परंतु तशी वेळ आली नाही. शेतकरी आणि पोलीस या दोघांनीही परस्परांना सहकार्य केल्याने आंदोलनादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. नागपूर : वाणिज्य महाविद्यालयाजवळ शेतकर्‍यांचा मोर्चा अडविण्यात आल्यावर याच ठिकाणी शरद जोशी, वामनराव चटप, राम नेवले आदींसह हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी तांत्रीक अटक करुन काही वेळांनी सुटका ेकेली.सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश होते. परंतु एकूणच आंदोलन हे शांततेत पार पडल्याने सायंकाळी ४ वाजता आंदोलकांना सोडण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. 
दरम्यान, रविवारी सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गिरीपेठ येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात एकत्र जमले. यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. आदिवासी विकास भवन, आरटीओमार्गे हा मोर्चा लॉ कॉलेज चौकाच्या दिशेने निघाला. परंतु पोलिसांनी चौकापूर्वीच तो अडविला. त्यामुळे या ठिकाणीच शेतकर्‍यांनी ठिय्या दिला.
मुख्यमंत्री निवासस्थान,
परिसराला पोलिसांचा वेढा
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धरमपेठ येथील निवासस्थान आणि परिसराकडे जाणार्‍या सर्व मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर पोलिसांचा पहारा होता. निवासस्थानाकडे जाणारे सर्व छोटे-मोठे रस्ते कठडे लावून बंद करण्यात आले होते. निवासस्थानीही पोलिसांचा कडेकोट बंदबस्त होता. चौकाचौकात साध्या पोशाखातील पोलीस लक्ष ठेवून होते. त्यामुळे एकाही आंदोलकाला तिकडे फिरकताही आले नाही. (प्रतिनिधी)


Nagpur Thiyya

शेतकर्‍यांच्या अडचणी, समस्या, आक्रोश ऐकायला शासन आणि नेत्यांकडे वेळ नाही. प्रकृती अस्वस्थ्यामुळे यापुढे आंदोलनात सहभाही होणे शक्य होणार नाही. वारंवार आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई, नागपूरला जाणे गरीब शेतकर्‍यांना परवडणारे नाही. यामुळे शेतकर्‍यांनो आपआपल्या गावातच गावबंदी आंदोलन करून राजकीय नेत्यांना जाब विचारा, असे आवाहन करीत शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली.
शेतकर्‍यांच्या ठिय्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही शेतकरी संघटनेतर्फे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज रविवारी दुपारी गिरीपेठेतील शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे अर्धा किलोमीटर आधीच अमरावती लॉ कॉलेज चौकातच पोलिसांकडून मोर्चेकर्‍यांना अडविण्यात आले. येथेच शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार सरोज काशीकर, अँड. वामनराव चटप, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, शैलजा देशपांडे आदींचा समावेश होता. 
यावेळी शेतकर्‍यांना केलेल्या मार्गदर्शनात जोशी पुढे म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्षासाठी स्वतंत्र मागणीपत्र तयार करण्यात आले आहे. ज्या पक्षाचा नेता गावात येईल त्यानुसार त्यांना निवेदन देऊन यास्थितीत काय करायचे, असा जाब विचारा. कोणत्याही स्थितीत नेत्यांना गावात भाषण देण्यापासून रोखा. शरद जोशी यांच्या भाषणानंतर उपस्थित प्रमुख नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

Nagpur Thiyya

लोकशाही वार्ता / नागपूर : अस्मानी संकटानंतर सुलतानी धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पोलिसांच्या मनाईनंतरही शेकडो शेतकर्‍यांनी आज रस्त्यावर येऊन शासन आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रोश केला. शेतकरी नेते शरद जोशी यांनी पुन्हा नव्या आंदोलनाची हाक देत 'लढ बापु लढ'चा आवाज बुलंद केला. लॉ कॉलेज चौकातूच मोर्चेकर्‍यांना रोखण्यात आले. येथे आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍यांसह शेतकर्‍यांना स्थानबद्ध केले. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 
शेतरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर 'ठिय्या आंदोलना'ची घोषणा केली होती. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतरही शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. त्यानुसार राज्यभरातून शेतकरी शहरात दाखल झाले. आज दुपारी १ वाजता गिरीपेठ येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयातून मोर्चा प्रारंभ झाला. उत्पादनखर्च अधिक ५0 टक्के नफा या आधारावर कृषिमालाला भाव देण्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपाने आश्‍वासनपूर्ती करावी. मरणासन्न अवस्थेत असणार्‍या शेतकर्‍यांना तारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकर्‍यांची आगेकूच सुरू होती. लॉ कॉलेज चौकात पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना अडविले. यानंतर तेथेच मोर्चेकर्‍यांना ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शरद जोशी यांनी पुढार्‍यांना गावबंदी घालण्याचे आवाहन करीत पुन्हा नव्या आंदोलनाची घोषणा केली. 
यावेळी सर्वच मान्यवरांनी वेगळय़ा विदर्भाचा आवाज बुलंद केला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याहीस्थितीत न्याय मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना क्रांतीच्या मशाली तेवत ठेवाव्या लागतील, अशी अपेक्षा अँड. वामनराव चटप यांनी व्यक्त केली. झोपडीत जाऊन मत मागणार्‍या राजकारण्यांना आज शेतकर्‍यांच्या भेटीसाठी वेळ मिळाला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. उध्वस्त शेतकर्‍यांना सावरण्यासाठी मार्शल प्लान तयार करून त्याची अंमलबजावणी करा, असे आवाहन सरोज काशीकर यांनी केले. गुणवंत पाटील हंगर्गेकर, संजय कोल्हे, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, नंदा पराते, शैलजा देशपांडे, नवृत्त पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, दिनेश शर्मा, अनंत देशपांडे आदींचीही यावेळी भाषणे झाली.

Nagpur Thiyya

नागपूर- शेतक-यांचे ठिय्या आंदोलन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत शेतक-यांच्या सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली.
कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा असंख्य समस्यांनी हैराण झालेल्या शेतक-यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत, सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रचंड मोठ्या संख्येने शेतक-यांनी हजेरी लावली. सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली.
शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोशी व अन्य नेत्यांशी गुरुवारी चर्चा केली. त्यातून काहीच पदरात न पडल्याने संघटना आपल्या आंदोलनावर ठाम होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास गिरीपेठेत जमल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. मात्र, सर्वांना लगेच अडवण्यात आले. यावेळी बोलताना वक्त्यांनी भाजपाने केलेल्या घोषणांची आठवण करून दिली.
शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती व्हावी, वीज बिल माफी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापासून काही अंतरावर रविवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली गिरीपेठेतील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांच्या कार्यालयाजवळून शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच केले. पण, सर्वाना अमरावती रोडवरील जी.एस. कॉलेजच्या प्रवेशद्वारजवळच अडवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तेथेच ठिय्या देऊन, देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेल्या मागण्या आणि दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.
नेत्यांना गावबंदी करा
यापुढे आंदोलनाचा त्रास शेतक-यांना होता कामा नये म्हणून गावातच नेत्यांना गावबंदी करा, असे आवाहन शरद जोशी यांनी यावेळी बोलताना केले. गावात भाषणासाठी आलेल्या नेत्यांना बोलू देऊ नका. त्यांच्यासमोर प्रश्न मांडा, त्याची खरी उत्तरे मिळाल्यानंतरच भाषण होऊ द्या. अन्यथा येणा-या नेत्यांना हुसकावून लावा. गावोगावी हे आंदोलन उभारा, अशी सूचना त्यांनी केली.

Nagpur Thiyya

Nagpur Thiyya

Nagpur Thiyya



Nagpur Thiyya


Nagpur Thiyya



Nagpur Thiyya

Nagpur Thiyya


Nagpur Thiyya



Nagpur Thiyya

Nagpur Thiyya


Nagpur Thiyya


------------------------------------------------------------
------------------------------------------------------------
------------------------------------------------------------
------------------------------------------------------------
------------------------------------------------------------
------------------------------------------------------------


संत्रा उत्पादकांनी मांडल्या समस्या  : यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादक पूर्णपणे अडचणीत आले आहे. संत्र्याला मिळणारा दर फारच अल्प असून त्यातून उत्पादन खर्च भरून निघत नाही. शासनाकडून कुठल्याच सवलती मिळत नसल्याने संत्रा उत्पादक हवालदिल आहेत. त्यांचे प्रश्‍न शेतकरी संघटनेने लावून धरावे. अशी मागणी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शरद जोशी यांच्याकडे केली. संत्र्यांपासून तयार केलेला हाराने जोशी यांचे स्वागत करून प्रश्‍नाचे गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केला. 

विदर्भासह मराठावाडा राज्य जाहीर करा : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती आणि समस्या सारख्याच आहेत. निधी वाटपातदेखील नेहमी विदर्भाप्रमाणेच अन्याय केला जातो. तसेच विकासाचा बराच अनुशेष शिल्लक आहे. आमचा स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा असून याच पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र मराठावाडा राज्य घोषित करा, अशी मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर यांनी केली. 

कृषी धोरण बदला : सध्या अस्तित्वात असलेले कृषी, सिंचन, पतधोरण पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यातून आलेल्या नैराश्‍यामुळे आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे कृषी धोरणात बदल करून नवे धोरण तयार करण्यात यावे. यासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला


-----------------------------------------------------
आंदोलनापूर्वीची बातमी ------------------------------------------------------ आंदोलनापूर्वीची बातमी -----------------------------------------------------
आंदोलनापूर्वीची बातमी
---------------------------------------------------
 नागपूर: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दिंरगाई झाल्यास, येत्या 30 नोव्हेंबरला नागपुरात फडवणीवासांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांनी दिला. ते नागपुरात बोलत होते. जागतिक युद्धात जसा युरोप बेचिराख झाला तशीच स्थिती राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी विशेष योजनेची गरज असल्याचं मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी व्यक्त केले आहे. तसंच प्रसार माध्यमांनी इतर छोटे छोटे आंदोलने दाखविताना शेतकऱ्यांच्या आंदोलनांनाही महत्व द्यावं. सध्या राज्यातील शेतकरी उत्पादन आणि भाव दोन्ही घसरल्याने शेतकरी मोठ्या संकटात असल्याचं शरद जोशी म्हणाले. हरित क्रांती नंतरही शेतमालाला भाव का मिळत नाही, अशा गोंधळात असलेल्या शेतकऱ्याला दिशा देण्याचे काम शरद जोशी यांनी केल्याचे मत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले. हरितक्रांती नंतर उद्भवलेल्या नव्या समस्यांची ओळख शरद जोशी यांनीच शेतकऱ्य़ांना करून दिली. शेतमालाला भाव का मिळत नाही, हे न उलगडलेले गुपित पहिल्यांदा शरद जोशी यांनीच शेतकरी आणि समाजापुढे आणले आणि आंदोलने उभी केल्याचं राजीव खांडेकर यांनी सांगितलं. यांदाच्या वर्षीचा मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार शेतकरी नेते शरद जोशी यांना प्रदान कऱण्यात आला. 
----------------------------------------------------------------------- --------------------------------------------------- ---------------------------------------------------

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून

आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे