Friday, November 28, 2014

शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार

शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर २०१४ रोज मंगळवारी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देवून सन्मान केला. याक्षणी संपूर्ण सभागृहाने स्वयंस्फ़ूर्तीने उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदन अर्पण केली. यावेळी ज्येष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर, खा. सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे, श्री भानू काळे आदी उपस्थित होते.

             या सोहळ्याला अ‍ॅड वामनराव चटप, सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजाताई देशपांडे, सौ. पानसे, अ‍ॅड दिनेश शर्मा, गुणवंत पाटील, गोविंद जोशी, गंगाधर मुटे, अनंतराव देशपांडे,  निवृती कडलग, संजय पानसे, कडुआप्पा पाटील, राजाभाऊ पाटील, रमेश खांदेभराड आवर्जून उपस्थित होते.

             या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भुपेश मुडे, कुशल मुडे, रमेश झाडे, पुंजाराम सुरुंग, महादेव काकडे, गजानन भांडवले यांचेसह अनेक शेतकरी संघटनेचे पाईक उपस्थित झाले होते.
              यशवंतराव चव्हाण पुरस्काराच्या निमित्ताने शेतकरी चळवळ आणि सत्तेचे राजकारण या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज नेते एका व्यासपीठावर आल्याचे मुंबईकरांना बघायला मिळाले. शरद जोशी आ​णि शरद पवार या दोघांनीही आपापल्या भाषणात परस्परांच्या ​क्षेत्रातील कार्याला मनापासून ​दाद दिली. मात्र एकमेकांची अवास्तव प्रशंसा करण्याचे दोघांनीही कटाक्षाने टाळले. दोघांनीही एकमेकांच्या कार्याविषयी बोलताना तोलूनमापून योग्य तेच शब्द वापरले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. सुप्रिया सुळे यांनी तर मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनी केले. अंतर्नादचे संपादन भानू काळे यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेतला.

सत्काराला उत्तर देताना शरद जोशींनी केलेल्या भाषणातील ठळक वैशिष्टे :
- इंडिया विरुद्धच्या लढ्यात भारताचा सपशेल पराभव झाला आहे. इंडिया जिंकला आहे. भारतातला शेतकरी बेचिराख झाला आहे.
- भारत निर्माण करण्याचे काम करण्याची क्षमता शरद पवार यांच्यात आहे. भारताला सक्षमतेनं उभं करण्याचं काम शरद पवारांनी करावे.
- भारताला पुन्हा उभे करण्यासाठी मार्शल प्लॅन तयार करण्याची आवश्यकता आहे.
- शेतीमध्ये एका दाण्याचे हजार दाणे पिकवण्याची क्षमता असली तरी शेतीच्या लुटालूटीमुळे शेतकर्‍याला स्वत:चे धड पोट देखील भरता येत नाही.
- जगाचा उत्क्रांतीचा इतिहास हा शेतीच्या वरकड उत्पन्नाच्या लुटालुटीचा इतिहास आहे.
- राज्यात पिकांची अवस्था वाईट असून, शेतमालाचे दर कोसळल्यामुळे शेतकरी बेचिराख होण्याची लक्षणे आहेत. बरे झाले, आज शरद पवार हे शेजारीच सापडले. तुमच्या राजकारणात कसे बसते ते बघा. पण ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनात तुम्ही सहभागी झाले तर आनंदच होईल.

शरद पवारांच्या भाषणातील ठळक वैशिष्टे :

- शरद जोशी आणि माझे वैचारिक मतभेद असले तरी शेतकऱ्यांचे हीत ही एकच दिशा आहे.
- शेती आणि शेतकरी ही एकमेव भूमिका घेऊन शरद जोशी यांनी आयुष्यभर विधायक हेतूने काम केले. त्यातच शेतकरी स्त्रियांना स्वाभिमान देण्याचे मोठे सामाजिक कार्य उभारल्याचा अभिमान वाटतो.
- शेतीच्या क्षेत्रतील शरद जोशींचे योगदान मोठे आहे. देशाचा कृषिमंत्री म्हणून पंजाबसारख्या राज्यात कार्यक्रमात जावे लागायचे. तिथे अनेकदा माझा परिचय शरद जोशी असा केला जायचा. ही त्यांच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे!
- जणुकिय बियाणे, संशोधित वाणाबाबत घेतलेल्या निर्णयावर संसदेत व माध्यमात मोठी टिका झाली. मात्र, अशावेळी शेतकर्‍यांचे हित लक्षात घेत शरद जोशींचा पाठिंबा मिळाल्याने निर्णय घेणे सुलभ झाले.
- शेतीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी काही कठोर निर्णयांची आवश्यकता होती. केंद्रीय कृषी मंत्री या नात्याने काही निर्णयावर टीका झाली पण त्या निर्णयाचे शरद जोशी यांनी समर्थन केले होते.
- महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेसाठीही जोशींनी मोठे काम केले, असे गौरोद्गारही पवार यांनी काढले.

                                                                                                                - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Mumbai
-------------------------------------------
Mumbai
-------------------------------------------
Mumbai
-------------------------------------------
Mumbai
-------------------------------------------

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून

आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे