Friday, December 31, 2010

महामार्गावर कांदावाटप आंदोलन

पिंपळगाव बसवंत 



महामार्गावर कांदावाटप आंदोलन
शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्‍यांचा सहभाग.
अधिक सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

http://72.78.249.107/Sakal/31Dec2010/Normal/Nashik/page10.htm  


..............................................................................................

Friday, December 24, 2010

आधारभूत भावाने तुरीची शासकीय खरेदी सुरू करा.


आधारभूत भावाने तुरीची शासकीय खरेदी सुरू करा.

(दिनांक २३ डिसेंबरला शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन खालील प्रमाणे निवेदन देण्यात आले.)
.............................................................................................
प्रती,

विभागीय आयुक्त (महसूल)
नागपूर.

निवेदक :-  शेतकरी संघटना, वर्धा

विषय :- नागपूर विभागातील नागपूर ,वर्धा, चंद्रपूर या तूर उत्पादक जिल्ह्यात आधारभुत भावाने तुरीची खरेदी करण्यासाठी नाफ़ेड/ मार्केटींग फ़ेडरेशन/ कृउबास/  शासनामार्फ़त तुरीची खरेदी केंद्र सुरू  करण्याचे निदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना यथाशिघ्र निर्गमीत करण्याबाबत .

महोदय,
केंद्र शासनाने चालु हंगामाकरीता तुरीची आधारभुत किंमत रु. ३०००/- प्रती क्विंटल जाहीर केली असून राज्य शासनाने क्विंटलमागे रु. ५००/- अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.  बाजारात १५ दिवसापूर्वी रु. ४०००/- असलेले प्रती क्विंटल तुरीचे भाव रु. २४००/- ते २६५०/- पर्यंत खाली पडलेले आहे.
शासकीय धोरणाप्रमाणे व कायद्याप्रमाणे आधारभूत किंमतीच्या खाली बाजाराभाव आल्यास हस्तक्षेपीय योजनेखाली शासनाने  स्वत: अथवा विषयान्कित यंत्रणेमार्फ़त खरेदीकेंद्रे सुरू करून शेतकर्‍यांना संरक्षण देवून त्यांची लुट थांबविणे गरजेचे आहे. आधीच शेतकरी आत्महत्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व बाबी विचारात घेता तुरीची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करून बोनससह भाव (३०००+५००=३५००) मिळणे आवश्यक व न्यायोचीत आहे.
सबब आपणास विनंती की नागपूर विभागातील नागपूर ,वर्धा, चंद्रपूर या तूर उत्पादक जिल्ह्यात आधारभुत भावाने तुरीची खरेदी करण्यासाठी नाफ़ेड/ मार्केटींग फ़ेडरेशन/ कृउबास/  शासनामार्फ़त तुरीची खरेदी केंद्र सुरू  करण्याचे निदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना यथाशिघ्र निर्गमीत करण्यात यावे.
                                                                        
नागपूर
दि. :  २३-१२-२०१०                      निवेदक

१) अ‍ॅड वा.स.चटप,  प्रांताध्यक्ष, स्वभाप
२) सौ. सरोजताई  काशीकर, मा. अ. शे.सं
३) राम नेवले, माजी अध्यक्ष, शे.सं
४) मधुसुदन हरणे, विभाग प्रमुख, शे.सं  
५) अरूण केदार, जिल्हाध्यक्ष शे.सं. नागपुर
६) गंगाधर मुटे, जिल्हाध्यक्ष शे.सं. वर्धा
७) प्रभाकर दिवे, जिल्हाध्यक्ष शे.सं. चंद्रपूर
.........................................................................

Wednesday, December 22, 2010

स्टार माझा टीव्हीवरील मा. शरद जोशी यांची मुलाखत.

स्टार माझा टीव्हीवरील मा. शरद जोशी यांची मुलाखत.

                 अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी आले. शेतकर्‍यांचा खर्च भरून निघण्यासाठी कांद्याला प्रति किलो १०० रु. भाव मिळायलाच हवे असे प्रतिपादन शेतकर्‍यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांनी स्टार माझा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी १९८० ते २०१० असा शेतकरी संघटनेचा प्रवास आणि 
आर्थिक व राजकिय उपलब्धी यावर सविस्तर विवेचन केले. 

तेव्हा चला ऐकूया स्टार माझा टीव्हीला दिलेली मुलाखत.
मुलाखत प्रसारण दि. - २२-११-२०१० वेळ - रात्री ७.३०

१) मुलाखत भाग-१


..........................................................
२) मुलाखत भाग-२


.........................................................

मा. शरद जोशींची रावेरी भेट

मा. शरद जोशींची रावेरी भेट

दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशींनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख, गंगाधर मुटे आदी उपस्थित होते.


**   **  **   **  **  **  **   **   **   **
**   **  **   **  **  **  **   **   **   **


**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **

**   **  **   **  **  **  **   **   **   **
**   **  **   **  **  **  **   **   **   **

.........................................................................................................................................................

थकीत वीजबिल परिषद

कापूस निर्यातप्रश्‍नी ठोस पावले उचला
-
बुलडाणा - 
दि-१७

                  येत्या सात दिवसांच्या आत कापसाच्या निर्यातीबाबत ठोस पावले न उचलल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात आंदोलन केले जाईल. तसेच तुरीची हमीभावाने खरेदी न केल्यास राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटना जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी दिला. 
               संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते शुक्रवारी (ता. 17) सायंकाळी स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. या वेळी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप, नामदेवराव जाधव, वामनराव जाधव, मराठवाडा प्रमुख कैलास तवर, सम्राट डोंगरदिवे, जगदीश बोंडे, बाबूराव नरोटे, डॉ. देशमुख, दामोदर शर्मा, विनायक वाघ आदी उपस्थित होते.
               श्री. देवांग म्हणाले, "कापसाच्या निर्यातीबाबत ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन महिन्यांत कापूस एक हजाराने घसरला. आज कापसाची दहा टक्केसुद्धा निर्यात नाही. निर्यातीबाबत धोरण ठरले नाही तर आणखी भाव पडतील. त्यामुळेच शासनाने येत्या सात दिवसांत याबाबत काही ठोस धोरण न अवलंबिल्यास प्रत्येक तालुक्‍यात कार्यकर्ते आंदोलन करतील. शासनाने तुरीसाठी हमीभाव जाहीर करतानाच 500 रुपये जास्त देण्याचे जाहीर केले; मात्र सध्याचे चित्र पाहिले तर सर्वच बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी दराने तुरीची खरेदी केली जात असून हा एक गुन्हा आहे. येत्या सात दिवसांत हमीभाव खरेदी केंद्र सुरू न केल्यास राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालतील. थकीत वीज बिलाचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा असून शासनाने आश्‍वासन देऊनही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. उसाच्या मुद्यावरही योग्य दर न दिल्यास शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील.”
              श्री. चटप म्हणाले, "केंद्र शासनाने भू-सुधार समितीचा अहवाल स्वीकारू नये. हा अहवाल स्वीकारल्यास शेतकरी उघड्यावर येईल. आधीच विविध सर्वेक्षणांनुसार 40 ते 60 टक्के शेतकरी आज शेती परवडत नसल्याने त्यापासून दूर जाण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समोर आले आहे. हा कायदा लावल्यास शेती उद्‌ध्वस्त होईल. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करून भ्रष्टाचाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली पाहिजे.”
"नौ दो ग्यारह’

              राज्यभरात शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचा प्रश्‍न गाजतो आहे. अवास्तवरीत्या शेतकऱ्यांना वीज आकारणी झालेली असून ती ते भरू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. यावर ठोस कृती केली जात नाही. त्यामुळेच "नौ दो ग्यारह’ म्हणजेच येत्या नऊ फेब्रुवारी 2011 रोजी पारस येथे "थकीत वीजबिल परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला दहा हजारांवर कार्यकर्ते कुटुंबासह येतील. यापुढे संघटना गनिमी काव्याचा वापर करून आंदोलने करेल, असेही देवांग यांनी सांगितले.

..............................................................

Wednesday, December 15, 2010

अभिनंदन सोहळा

अभिनंदन सोहळा
दिनांक १४  वर्धा :


                       शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांना त्यांच्या "रानमोगरा - शेती आणि कविता" या ब्लॉगला स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीतर्फ़े घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील मराठी ब्लॉग माझा स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने शाल आणि श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला.
                          दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, कैलासजी तंवर, शैलाताई देशपांडे, सुमनताई अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
                           सभेला श्री जगदीशनाना बोंडे, विजय विल्हेकर, अरुण केदार, प्रा. झोटींग, मधुसुदन हरणे, तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते.


...................


शेतकरी संघटना


गंगाधर मुटे यांना शाल, श्रीफ़ळ व मानपत्र देवून गौरवतांना मा. शरद जोशी
...................
 गंगाधर मुटे - मनोगत
                        मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्‍यांची संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल "बेदखल" असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्‍यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
                       त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्‍यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
                  मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
                मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
              दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्‍यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
              तिसरा प्रश्न. या तिसर्‍याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
             मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
             शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
                आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता लिहायला लागलो.
               यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.

* * *
               सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्‍या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्‍हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.
* * *
               शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्‍याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्‍या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्‍याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.

* * *


शेतकरी संघटना


शेतकरी सत्कार समारंभ सभेस संबोधीत करतांना मा. शरद जोशी


                     समारोपीय भाषणात मा. शरद जोशी म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, पण आपण कुणाचं फ़ारसं कौतुक केलं नाही.अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्‍हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्यावे. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो.
                मी शक्यतो कोणत्याही कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. गंगाधर मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर तो त्यांनी व्दिगुणित करून घ्यावा. कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही. 
                   गंगाधर मुट्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरिता प्रस्तावना लिहिल्यानंतर आणि मी तेथे हजर राहणार आहे म्हटल्यावरती लोकांच्या मनात साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाच पुस्तक आणि ते पुस्तक कॉम्प्युटरवर, नेटवर्कवर केलं आहे, म्हणजे नेमकं काय, याची फारशी कल्पना कार्यकर्त्यांना असण्याची शक्यता नाही. माझी या प्रसंगात थोडीशी अडचण होते ती अशी की मी मुळामध्ये काव्यबुद्धीचा नाही. काव्यप्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. पुण्याला राष्ट्रसेवादलाच्या एका बैठकीमध्ये ना.ग.गोरे यांना त्यांच्या बैठकीमध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखाच्या संख्येने लोक येतात, लाखाच्या संख्येनं तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात, त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये, मघाशी गंगाधर मुट्यांनी म्हटल्याप्रमाणे, साहित्यनिर्मिती फारशी नाही. आणि साहित्याकरिता केवळ गद्यलिखान, लेख आणि पुस्तके लिहून भागत नाही. ना.ग.गोर्‍यांनी असं म्हटलं की याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची मांडणी सगळी गद्य स्वरूपाची आहे. आणि शेतकरी किंवा कोणतेही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्ककर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याशिवाय लोकं आहुती चाखायला तयार होत नाही.
                मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव, सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्तीनाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
                 मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्‍यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.

* * * * * * * * * *
............................................................

मा. शरद जोशींचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.



.............................................................


......


......



......


......



.....



.....