(दिनांक २३ डिसेंबरला शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन खालील प्रमाणे निवेदन देण्यात आले.)
.............................................................................................
प्रती,
विभागीय आयुक्त (महसूल)
नागपूर.
निवेदक :- शेतकरी संघटना, वर्धा
विषय :- नागपूर विभागातील नागपूर ,वर्धा, चंद्रपूर या तूर उत्पादक जिल्ह्यात आधारभुत भावाने तुरीची खरेदी करण्यासाठी नाफ़ेड/ मार्केटींग फ़ेडरेशन/ कृउबास/ शासनामार्फ़त तुरीची खरेदी केंद्र सुरू करण्याचे निदेश सर्व जिल्हाधिकार्यांना यथाशिघ्र निर्गमीत करण्याबाबत .
महोदय,
केंद्र शासनाने चालु हंगामाकरीता तुरीची आधारभुत किंमत रु. ३०००/- प्रती क्विंटल जाहीर केली असून राज्य शासनाने क्विंटलमागे रु. ५००/- अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. बाजारात १५ दिवसापूर्वी रु. ४०००/- असलेले प्रती क्विंटल तुरीचे भाव रु. २४००/- ते २६५०/- पर्यंत खाली पडलेले आहे.
शासकीय धोरणाप्रमाणे व कायद्याप्रमाणे आधारभूत किंमतीच्या खाली बाजाराभाव आल्यास हस्तक्षेपीय योजनेखाली शासनाने स्वत: अथवा विषयान्कित यंत्रणेमार्फ़त खरेदीकेंद्रे सुरू करून शेतकर्यांना संरक्षण देवून त्यांची लुट थांबविणे गरजेचे आहे. आधीच शेतकरी आत्महत्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व बाबी विचारात घेता तुरीची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करून बोनससह भाव (३०००+५००=३५००) मिळणे आवश्यक व न्यायोचीत आहे.
सबब आपणास विनंती की नागपूर विभागातील नागपूर ,वर्धा, चंद्रपूर या तूर उत्पादक जिल्ह्यात आधारभुत भावाने तुरीची खरेदी करण्यासाठी नाफ़ेड/ मार्केटींग फ़ेडरेशन/ कृउबास/ शासनामार्फ़त तुरीची खरेदी केंद्र सुरू करण्याचे निदेश सर्व जिल्हाधिकार्यांना यथाशिघ्र निर्गमीत करण्यात यावे.
अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी आले. शेतकर्यांचा खर्च भरून निघण्यासाठी कांद्याला प्रति किलो १०० रु. भाव मिळायलाच हवे असे प्रतिपादन शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांनी स्टार माझा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी १९८० ते २०१० असा शेतकरी संघटनेचा प्रवास आणि
आर्थिक व राजकिय उपलब्धी यावर सविस्तर विवेचन केले.
तेव्हा चला ऐकूया स्टार माझा टीव्हीला दिलेली मुलाखत.
मुलाखत प्रसारण दि. - २२-११-२०१० वेळ - रात्री ७.३०
दि. १५ नोव्हेंबर २०१० रोजी मा. शरद जोशींनी रावेरी येथील सीतामंदीरास भेट देवून पाहणी केली.
त्यांच्यासोबत मा. रवीभाऊ देवांग, मा. वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, गुणवंतराव पाटील, कैलासजी तंवर, रमेश पाटील, नितीन देशमुख, रमेश देशमुख, गंगाधर मुटे आदी उपस्थित होते.
येत्या सात दिवसांच्या आत कापसाच्या निर्यातीबाबत ठोस पावले न उचलल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन केले जाईल. तसेच तुरीची हमीभावाने खरेदी न केल्यास राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटना जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी दिला.
संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते शुक्रवारी (ता. 17) सायंकाळी स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. या वेळी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटप, नामदेवराव जाधव, वामनराव जाधव, मराठवाडा प्रमुख कैलास तवर, सम्राट डोंगरदिवे, जगदीश बोंडे, बाबूराव नरोटे, डॉ. देशमुख, दामोदर शर्मा, विनायक वाघ आदी उपस्थित होते.
श्री. देवांग म्हणाले, "कापसाच्या निर्यातीबाबत ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन महिन्यांत कापूस एक हजाराने घसरला. आज कापसाची दहा टक्केसुद्धा निर्यात नाही. निर्यातीबाबत धोरण ठरले नाही तर आणखी भाव पडतील. त्यामुळेच शासनाने येत्या सात दिवसांत याबाबत काही ठोस धोरण न अवलंबिल्यास प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते आंदोलन करतील. शासनाने तुरीसाठी हमीभाव जाहीर करतानाच 500 रुपये जास्त देण्याचे जाहीर केले; मात्र सध्याचे चित्र पाहिले तर सर्वच बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षाही कमी दराने तुरीची खरेदी केली जात असून हा एक गुन्हा आहे. येत्या सात दिवसांत हमीभाव खरेदी केंद्र सुरू न केल्यास राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालतील. थकीत वीज बिलाचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा असून शासनाने आश्वासन देऊनही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. उसाच्या मुद्यावरही योग्य दर न दिल्यास शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील.”
श्री. चटप म्हणाले, "केंद्र शासनाने भू-सुधार समितीचा अहवाल स्वीकारू नये. हा अहवाल स्वीकारल्यास शेतकरी उघड्यावर येईल. आधीच विविध सर्वेक्षणांनुसार 40 ते 60 टक्के शेतकरी आज शेती परवडत नसल्याने त्यापासून दूर जाण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समोर आले आहे. हा कायदा लावल्यास शेती उद्ध्वस्त होईल. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करून भ्रष्टाचाऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली पाहिजे.”
"नौ दो ग्यारह’
राज्यभरात शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न गाजतो आहे. अवास्तवरीत्या शेतकऱ्यांना वीज आकारणी झालेली असून ती ते भरू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. यावर ठोस कृती केली जात नाही. त्यामुळेच "नौ दो ग्यारह’ म्हणजेच येत्या नऊ फेब्रुवारी 2011 रोजी पारस येथे "थकीत वीजबिल परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला दहा हजारांवर कार्यकर्ते कुटुंबासह येतील. यापुढे संघटना गनिमी काव्याचा वापर करून आंदोलने करेल, असेही देवांग यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांना त्यांच्या "रानमोगरा - शेती आणि कविता" या ब्लॉगला स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीतर्फ़े घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील मराठी ब्लॉग माझा स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने शाल आणि श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला.
दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, कैलासजी तंवर, शैलाताई देशपांडे, सुमनताई अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला. सभेला श्री जगदीशनाना बोंडे, विजय विल्हेकर, अरुण केदार, प्रा. झोटींग, मधुसुदन हरणे, तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते.
...................
गंगाधर मुटे यांना शाल, श्रीफ़ळ व मानपत्र देवून गौरवतांना मा. शरद जोशी ...................
गंगाधर मुटे - मनोगत
मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, वाचत नाही आणि लिहितही नाही. त्याच अर्थाने शेतकर्यांची संघटनाही निरक्षर असते. त्यांच्या कार्याची दखल "बेदखल" असते. लाखो शेतकरी एकत्र येऊन मेळावा घेतला किंवा शांततामय मार्गाने धरणे दिले तरी प्रसार माध्यमात ती न्यूज बनत नाही, किंवा बनली तरी एखाद्या कोपर्यात आगपेटीच्या आकारात तिला स्थान मिळत असते. याउलट राजकीय व्यक्ती शिंकली किंवा एखाद्या सेलेब्रिटीच्या पोटात गर्भ वाढत असेल तर भारतीय प्रसार माध्यमांसाठी ती ब्रेकिंग न्यूज ठरत असते, वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने खर्ची पडायला लागतात.
त्या पार्श्वभूमीवर स्टार माझाला दखल घेण्याइतपत मी आंतरजालावर शेतकरी विषयक लेखन केलं, हे सर्वांना फ़ारच सुखावून गेलं असावं. नागपुरच्या भेटीत चटप साहेबांनी माझ्या सत्काराचा विषय काढला तेव्हा मी त्यांना म्हटले की, असं काही करू नये, शक्यतोवर टाळावे. तर ते म्हणाले “आमच्या मुलाचं कौतुक आम्ही नाही तर कुणी करावे.” वर्ध्याच्या मिटींगमध्ये सरोजताई म्हणाल्या. आम्ही सत्कार नाही तर “कौतुक सोहळा” करू. सत्कार काय किंवा कौतुक काय, शब्दामधले फ़रक. त्यामागची भावना आणि प्रेरणा मात्र एकच. सत्कार किंवा कौतुक करू नये असे नाही, पण या निमित्ताने माझ्या समोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला प्रश्न असा की सत्कार कुणी कुणाचा करायचा. आज माझ्या कवितांचे बर्यापैकी कौतुक होत आहे. माझ्या लेखनीला पुरस्कार मिळत आहे, मी प्रगल्भ आणि दर्जेदार लेखन करतो हे जवळपास सर्वमान्य होत आहे.
मग हे जर खरे असेल तर, एवढे चांगले लिहिण्याची शक्ती माझ्याकडे आली कुठून? मी वयाच्या विसाव्या वर्षी शेतकरी संघटनेत आलोय. मला माहित आहे की, मी शेतकरी संघटनेत येण्यापुर्वी एक दगड होतो. मी जे काही शिकलो ते शेतकरी संघटनेकडून शिकलो. मी जर आज प्रभावी आणि दर्जेदार काव्य लिहू शकत असेल तर ती बुद्धी मला फ़क्त आणि फ़क्त शेतकरी संघटनेने दिली आहे. शरद जोशींचे ,शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे विचार दर्जेदार होते म्हणून माझ्या लेखनीतले विचार दर्जेदार असावे, हे निर्विवाद सत्य आहे.
मग सत्कार कुणी कुणाचा करायचा? मी शेतकरी संघटनेचे आभार मानायचे की शेतकरी संघटनेने माझा सत्कार करायचा?
दुसरा प्रश्न. आम्ही चळवळीतली माणसं, आंदोलन आमचा पिंड. आजही मला मी कवी आहे याचा जेवढा अभिमान वाटत नाही त्यापेक्षा मी शेतकरी संघटनेचा सच्चा पाईक आणि एक आंदोलक आहे, याचा जास्त अभिमान वाटतो. आणि आंदोलकांनी जे काही करायचे ते स्वत:साठी नव्हे तर चळवळीसाठी करायचे असते. जगायचे तर चळवळीसाठी, मरायचे तर चळवळीसाठी हाच आंदोलकांचा धर्म असला पाहिजे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्यांनी शक्यतो सत्कारापासून वगैरे चार हात लांबच असले पाहिजे हे माझे मत.
तिसरा प्रश्न. या तिसर्याप्रश्नामागे इतिहास आहे. शेतकरी संघटनेचा इतिहास असे सांगतो की, मुळातच दगड असलेल्यांना शेतकरी संघटनेने शेंदूर लावून मोठे बनविले. दगदाचा देव बनवला. पण मुळातच दगड असलेले दगड मोठेपण प्राप्त झाल्यावर स्वत:ला शेतकरी संघटना आणि शरद जोशींपेक्षाही मोठे तत्वज्ञानी,राजकारणी समजायला लागले, आणि ज्या संघटनेने त्यांना मोठे बनविले त्या संघटनेशी दगाबाजी करून उठून पळालेत. १९८० ते २०१० या काळातील संघटनेला सोडून गेलेल्यांची यादी बनविली तर ही बाब निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे यापुढे तरी संघटनेने सावधगिरीने पावले टाकली पाहिजेत असे मला वाटते.
मला सध्या एक प्रश्न विचारला जातो की मी असा अचानक कवितेकडे कसा काय वळलो, त्यामागची प्रेरणा काय? वगैरे. याबाबत मी माझ्या ‘रानमेवा’ या काव्यसंग्रहातील लिहिलेल्या भुमिकेत सविस्तर उहापोह केला आहे.
शेतकरी संघटनेच्या एवढ्या वर्षाच्या प्रवासात एक मुद्दा नेहमीच चर्चीला गेला की, शेतकरी चळवळीला पुरक असं साहित्य का तयार होत नाही. शेतकरी समाजाचं वास्तववादी साहित्य तयार व्हायलाच पाहिजे. हाच प्रश्न बराच काळ सतावत होता आणि आजही सतावतो आहे कारण आपण म्हणतो की वास्तववादी साहित्य तयार व्हायला पाहिजे, पण आम्ही मात्र लिहिणार नाही,मग ते कुणी लिहायचं? तर इतरांनी लिहायचं. मला कायम प्रश्न पडतोय तो असा की आम्हाला जे दिसतंय, आम्ही जे भोगलंय, आमची अनुभूती, आमचा विचार पण तो आम्ही नाही लिहिणार, तो इतरांनी लिहावा. हे कसे शक्य आहे? हे शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मीती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढा प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत.
आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. बस्स. ह्या एकाच प्रेरणेपोटी मी हाती लेखनी धरली. आणि कविता लिहायला लागलो.
यानिमित्ताने आपण माझे कौतुक केले, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि म्हणुन मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
* * *
सभेत बोलताना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अॅड वामनराव चटप म्हणाले की, एकमेकाच्या सुखदु:खात वाटेकरी व्हावे हा माणसाचा स्वभाव आहे आणि शेतकरी संघटनेचं आपलं हे संयुक्त कुटूंब आहे. आपल्या संयुक्त कुटूंबातल्या एका भावाने एका वेगळ्या क्षेत्रात, संघटनेचं कार्य करता करता, त्याच्या मनातल्या असणार्या भावना, मनातल्या कल्पना, त्याच्या मनातल्या भुमिका, शेतकरी संघटनेचं काम हे गद्यातलं असलं तरी पद्यामध्ये मांडून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे, म्हणून, संघटना ही आपली आई आहे, आणि आईचं काम आहे की लेकराचं कौतुक करावं. म्हणून साहेब स्वत: आज गंगाधरच्या या सत्कार समारंभाला हजर आहेत. ज्याची दखल स्टार टीव्हीच्या चॅनेलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं त्या तर्हेचं कौतुक होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या कुटूंबातल्या माणसाला अवार्ड, पुरस्कार मिळतो तेव्हा आपल्या कुटूंबाचा घटक म्हणून त्याचं कौतुक करणं, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं आवश्यक असते. म्हणून आपण हा कौतुक सोहळा साजरा करीत आहोत.
* * *
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग म्हणाले की, गंगाधर मुटेंच्या एका कवितेत गावातला एक शाम्या नावाचा मुलगा बिपाशासाठी मुंबईला लुगडं घेऊन जातो आणि त्या शाम्यात गावरानपणा ठासून भरला आहे. श्याम्यानं तर कहरच केला. इच्चीबैन. आता इच्चीबैन या शब्दात असं काय आहे की ते प्रत्येकाला हसायला लावतं? तर गंगाधर मुटेंच्या शब्दातली ही जादू आहे. या कवितेची ओरिजिनीलीटी काय तर अस्सल गावरानपणा. गंगाधर मुटेंच्या कवितामधून त्यांची अनुभूती अभिव्यक्त झाली आहे. त्यांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांनी गझल लिहिली, त्यांनी लावणीपण लिहिली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की ती शेतकर्याची मुलगी म्हणते की “मला पावसात भिजू द्या.” तिला आता पावसात खेळायचे आहे. तिच्या मैत्रीनी म्हणतात की तिला मनसोक्त नाचू द्या. तिला स्वातंत्र्याचा आनंद घेऊ द्या. तिच्या आनंद घेण्याच्या कक्षा तिला रुंदावू द्या. अडथळे आणू नका. असे ती लावणी सांगते. गंगाधर मुटेंच्या कवितेमध्ये ती सगळी विविधता भरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की माझ्या आयुष्यात भाकरीचा शोध घेता घेता अर्ध आयुष्य निघून गेले आणि तारुण्यपणात पाहिलेले स्वप्न भाकरीच्या शोधातच उध्वस्त झाले. सुरुवातीला “बरं झाले देवाबाप्पा शरद जोशी भेटले” असे लिहिणार्या कवीची मध्यंतरीच्या काळात जणूकाही कविताच करपून गेली होती. मध्ये बराच मोठा अंतराळ गेला, पुन्हा त्यांची कविता बहरून आली आणि ते संघटनेचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांच्या कवितेचं स्टारमाझाने कौतुक केलं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या कार्यकर्याचं कौतुक करीत आहो. मा. शरद जोशींनी ज्या दिवशी गंगाधर मुटेंच्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली, मला असं वाटतं की यापेक्षा मोठं कौतुक या कवीचं दुसरं कोणतंच असू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या कवीचं टाळ्या वाजवून जोरदार कौतुक करुया.
* * *
शेतकरी सत्कार समारंभ सभेस संबोधीत करतांना मा. शरद जोशी
समारोपीय भाषणात मा. शरद जोशी म्हणाले की, शेतकरी संघटनेच्या सगळ्या इतिहासामध्ये कार्यकर्त्यांना काही पुरस्कार मिळाले आणि त्याकरिता त्यांच्या कौतुकाची काही बैठक झाली, समारंभ झाले असे कधी झाले नाही. कौतुक करावे असे प्रसंग घडले नाहीत असे नाही, पण आपण कुणाचं फ़ारसं कौतुक केलं नाही.अशी परंपरा नसताना एका अगदी वेगळ्या तर्हेच्या कामगिरीकरिता किंवा कौतुकाकरिता हा सत्कार समारंभ आहे. ज्या क्षेत्रामध्ये मुट्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते क्षेत्र माझं आहे, हे लक्षात घ्यावे. मी हिंदुस्थानात येऊन शेतकरी संघटनेच्या कामाला लागण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गणकयंत्र विभागाचा प्रमुख होतो.
मी शक्यतो कोणत्याही कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीत नाही. गंगाधर मुट्यांच्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, त्याचा त्यांना आनंद वाटत असेल तर तो त्यांनी व्दिगुणित करून घ्यावा. कारण मी पूर्वी कधी प्रस्तावना लिहिलेली नाही.
गंगाधर मुट्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि त्याकरिता प्रस्तावना लिहिल्यानंतर आणि मी तेथे हजर राहणार आहे म्हटल्यावरती लोकांच्या मनात साहजिकच थोडं कुतूहल नेहमीपेक्षा जास्त वाटलं. आणि गंगाधर मुटे वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तेव्हा जिल्हाध्यक्षाच पुस्तक आणि ते पुस्तक कॉम्प्युटरवर, नेटवर्कवर केलं आहे, म्हणजे नेमकं काय, याची फारशी कल्पना कार्यकर्त्यांना असण्याची शक्यता नाही. माझी या प्रसंगात थोडीशी अडचण होते ती अशी की मी मुळामध्ये काव्यबुद्धीचा नाही. काव्यप्रतिभा ही माझ्याकडे शून्य आहे. पुण्याला राष्ट्रसेवादलाच्या एका बैठकीमध्ये ना.ग.गोरे यांना त्यांच्या बैठकीमध्ये कुणीतरी एक प्रश्न विचारला की शेतकरी संघटनेचं आंदोलन फार मोठं होतं, लाखाच्या संख्येने लोक येतात, लाखाच्या संख्येनं तुरुंगात जातात, शिक्षा भोगतात, त्यांच्या संबंध आंदोलनामध्ये, मघाशी गंगाधर मुट्यांनी म्हटल्याप्रमाणे, साहित्यनिर्मिती फारशी नाही. आणि साहित्याकरिता केवळ गद्यलिखान, लेख आणि पुस्तके लिहून भागत नाही. ना.ग.गोर्यांनी असं म्हटलं की याचं कारण असं आहे की शरद जोशी हा मनुष्यच मुळात गद्य स्वभावाचा आहे. त्याला काव्यशक्ती नसल्यामुळे त्याची मांडणी सगळी गद्य स्वरूपाची आहे. आणि शेतकरी किंवा कोणतेही आंदोलन चालवायचं म्हणजे इतकं तर्कशुद्ध, तर्ककर्कश असून भागत नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी थोडा पागलपणा यावा लागतो. आणि पागलपणा आल्याशिवाय लोकं आहुती चाखायला तयार होत नाही.
मी प्रामाणिकपणे सांगतो की, कुणाची सेवा करायची,कुणाची करुणा करायची या भावनेने मी कामाला लागलो नाही. अगदी व्यावहारिक तर्कशुद्ध हिशेब करून मी या कामाला लागलो. मी संयुक्त राष्ट्रसंघात राहिलो असतो तर भारताची राजकीय प्रतिष्ठा लक्षात घेता मी जास्तीत जास्त संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव, सेक्रेटरी जनरल त्याच्या खालोखाल डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदापर्यंत पोचलो असतो. पण मी जेव्हा मनाशी हिशेब केला की हिंदुस्थानातल्या दारिद्र्यनिर्मुलनाचे काम इतकं महत्त्वाचं आहे की त्या कामामध्ये कितीही कष्ट,पराजय,अपमान सोसावे लागले तरी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचीव होण्यापेक्षा या कामामध्ये मला जास्त आनंद वाटेल इतक्या तर्कशुद्ध बुद्धीने, गणिताने मी या कामात पडलेलो आहे. माझ्यामध्ये काव्यशक्तीनाही हा मुद्दा मी वारंवार मांडलेला आहे.
मी जेव्हा हिंदुस्थानात आलो तेव्हा गणकयंत्र इथे माहीत नव्हतं. राजीव गांधींनी ते नंतर आणलं. आणि त्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा आयको-२ मॉडेल आलं, त्याचा उपयोग करून मी शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, याचं एक सॉफ्टवेअर तयार केलं. त्या सॉफ्टवेअरमध्ये मी तुम्ही दररोज जे काही कामे करता त्यापैकी कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे, कोणकोणते खर्च हिशेबात धरायचे नाहीत, याचं एक मॉडेल त्याच्यामध्ये मांडलं होतं. पण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा आणि त्यानंतर आपली चूक झाली आणि अजूनही शेतकरी संघटनेचं संकेतस्थळ अजूनही पूर्णं झालेलं नाही. सुरुवात झाली पण त्याला नियमितपणे अपडेटींग करणे शेतकरी संघटनेला फारसं जमलेलं नाही. याउलट शेतकरी संघटनेच्या बरोबर झालेल्या चळवळी उदा. NGO ज्यामध्ये मेघा पाटकर, वंदना शिवा किंवा सुमन नारायण, यांच्या चळवळींना जनाधार जवळजवळ शून्य असताना, केवळ त्यांनी गणकयंत्राच्या हिशेबाने आपण फार मोठी संघटना आहे, हे दाखवलं. केवळ महसूलखात्याकडून किती शेतकर्यांनी आत्महत्यां केली, त्यांची नांवे, परिस्थिती यांची आकडेवारी घेऊन संकेतस्थळं तयार केली आणि मोठीमोठी पारितोषकं मिळवून गेली. आम्ही याबाबतीत फार कमी पडलो. अलीकडे या बाबतीत चांगल्यापैकी जागृती व्हायला लागली आहे. म्हात्रे सरांनी पहिल्यांदा जुना शेतकरी संघटक सुद्धा ई-मेलने पाठवायला सुरुवात केली आहे. आणि अलीकडे या ब्लॉगमध्ये मी निदान दोन नावं घेतो. सुधाकर जाधव आणि अमर हबीब हे दोघेही या प्रकारचं काम करताहेत. आज ना उद्या त्यांच्या कामालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मी आशा करतो. गंगाधर मुट्यांप्रमाणे ही मंडळीही या क्षेत्रात पुढे जातील आणि शेतकरी संघटनेची ही लुळी, कमजोर पडलेली बाजू थोडी आणखी मजबूत होईल अशी मी आशा करायला हरकत नाही.
दि. १० नोव्हेंबर २०१० रोजी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी संघटनेचा संतनगरी शेगावात स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शेतकरी महामेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हे होते. मंचावर माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, दिनेश शर्मा, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, हरीयाणाचे गुणीप्रकाश, कर्नाटकचे हेमंतकुमार, दिलीप भोयर, अनंत उमरीकर, सम्राट डोंगरदिवे, संजय कोले, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष नामदेवराव जाधव, रमेशसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
मेळाव्यात प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'माझा बाप शेतकरी' या कवितांची सीडी प्रकाशित करण्यात आली तसेच शरद जोशी यांच्या 'भारतासाठी' व 'पोशिद्याची लोकशाही' या दोन पुस्तकाचे तर कवी गंगाधर मुटे यांच्या 'रानमेवा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन शरद जोशींच्या हस्ते करण्यात आले. रावेरी येथे सिता मंदिराचे बांधकाम करणाऱ्या रमेश पाटील यांचा यावेळी शरद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद जोशी यांना यावेळी कृतज्ञता निधी वामनराव चटप, कैलास पवार, रवि देवांग यांच्या हस्ते देण्यात आला.
शरद जोशी यांना कवितेचे सन्मानपत्र
शरद जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेच्या ओळी चांदीच्या तबकावर कोरून ते मानपत्र प्रदान करण्यात आले. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होई पर्यंत कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणा केली होती मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जाणून मी हे सन्मानपत्र स्वीकारले असे जोशी यांनी स्पष्ट केले. मी शंभर वर्ष जगावे असे वाटत असेल तर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होण्याची लढाई जोमाने लढा माझ्यासाठी हीच उर्जा ठरेल असे भावनिक उदगार त्यांनी काढले. हे सन्मानपत्र जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ अप्पा बुरघाटे, बापुमामा थिटे, द्वारकाबाई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शरद जोशींनी आपल्या भाषणात धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.
* * * * *
"अमरावती-भुसावळ पॅसेंजर अडवितांना ठीय्या देऊन बसलेले शेतकरी.
................ "राज्यपालांना सादर करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करताना रविभाऊ देवांग व अॅड वामनराव चटप.
...............
.............. ........... राज्यपालांमार्फ़त त्यांचे अप्पर सचिव दे.च.खाडे व स्विय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्या नेत्यांशी चर्चा केली. शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात शेतकरी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले जाईल असे लेखी पत्र राज्यपालांमार्फ़त देण्यात आल्याने तीन तास चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले. ........................
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन
श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.
..........................................................
रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
.....................
रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
.....................
रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
.....................
रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अॅड उमरीकर इत्यादी
.......................
रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
.......................
थोडा हास्यविनोद.
........................
उपस्थित जनसमुदाय.
.......................
‘रानमेवा’
११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे.
‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी.
* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा.
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट शरद जोशी
या मंचावर उपस्थित असलेले आंध्रप्रदेश,हरयाना,कर्नाटक या राज्यांचे शेतकरी प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या महिला शेतकरी भावांनो आणि मायबहिनींनो, मी तुम्हाला पहिल्यांदा प्रणाम अशासाठी करतो की गेली सहा वर्षे मी राज्यसभेचा खासदार असल्यामुळे शेतकरी संघटनेचं हे सगळं वैभव पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. फ़ार फ़ार वर्षांनी पुन्हा एकदा सबंध मैदान गच्च भरलेली शेतकर्यांची सभा पुन्हा माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि माझे डोळे तृप्त झाले. गेल्या ८-१० दिवसातली बातमी आहे, वर्ध्यासारख्या ठिकाणी गांधीचं नाव घेऊन सोनिया गांधी स्वत: येत असताना कोट्यावधी रुपये जमा झाल्याखेरीज १०-२० हजाराची सभा कॉंग्रेसला जमा करता येत नाही. आणि येथे केवळ वर्तमानपत्रामध्ये निरोप देऊन लाखाच्या वरची सभा येथं जमते, तुम्हाला सगळ्यांना मी शतश: प्रणाम करतो.
मघापासून मी बघतो आहे, कधी इकडचा एखादा मनुष्य,कधी तिकडचा, कधी दोनचार इकडचे तिकडचे उठून मागे वळून पाहताहेत. जशी एखादी अत्यंत रुपवती सुंदर मुलीला आपण खरंच किती सुंदर आहो, त्याचा अंदाज घेण्याकरिता आरशाच्या समोर उभे राहून मागे वळून वळून पाहावंसं वाटतं, तसंच शेतकरी उभे राहून वळून मागे पाहात आहेत की, आपली गर्दी केवढी आहे. तुमचे सगळ्यांचे मी शतश: आभार मानतो. आणि त्याच्या बरोबर मी तुमची क्षमा मागतो. क्षमा अशाकरिता मागतो की, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत हिंदुस्थानातला सगळा शेतकरी संपूर्णत: कर्जमुक्त होत नाही – त्यात छोटा नाही,मोठा नाही,उसाचा नाही,कापसाचा नाही,सगळा शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही- तोपर्यंत कोणत्याही तर्हेचा सत्कार, कोणत्याही तर्हेचा हार, कोणत्याही तर्हेचा सन्मान मी स्विकारणार नाही, अशी मी तुमच्यासमोर शपथ घेतली होती. तुम्ही गेले दोन तास येथे बघताहात, इथे काय काय कार्यक्रम झाला आणि तुम्ही मनामध्ये प्रश्न विचारला असाल की शरद जोशींनी सत्कार घेणार नाही अशी शपथ घेतली होती, आणि इथे तर सत्कारच सत्कार चालू आहे. खरं आहे काय?
प्रतापसिंह यांनी शपथ घेतली होती की, जोपर्य़ंत चित्तोडचा किल्ला माझ्या हाती पुन्हा येत नाही तोपर्य़त मी गादीवर झोपणार नाही. प्रतापसिंह निघून गेले आणि मग त्यांच्या वंशज़ांनी नावापुरत्या गादीच्या खाली २-४ गवताच्या काड्या टाकून झोपायला सुरुवात केली, तसं काही शेतकरी संघटनेच्या बाबतीत होते की काय, अशी तुमच्या मनात शंका आली असेल. म्हणून भाषणाच्यापुर्वी मी तुम्हाला स्पष्ट करतो की, शेतीमालाला भाव मिळवून देणे आणि शेतीमालाला भाव मिळू नये याच्याकरिता जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जी जी काही अडथळे, जी जी काही बंधने घातली जातात, ती,त्या बंधनांचा प्राणपणाने विरोध करण्याची शपथ, मी संघटनेत घेतलेली प्रतिज्ञा आजही जशीच्या तशी शाबूत आहे. आणि तितक्याच वेगाने आता मी अमंलात आणणार आहे.
विचित्र गोष्ट अशी आहे की, इथे बोलतांना अनेकांनी सांगीतलं की महाराष्ट्राच्या शेतकर्यांसमोर फ़ार गंभीर प्रश्न उभे आहेत. तुमची वीज तोडून टाकणार असं उर्मटपणे मंत्री बोलतात आणि त्याच्याबरोबर दुसरा एक मंत्री दिल्लीहून सांगतो की आता तुमच्या डिझेलचा भाव दुप्पट तिप्पट होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतमजुरीचा दर जेव्हा शेतकरी संघटना चालू झाली होती तेंव्हा ३ रुपये होता. आज १५० रुपये रोजाच्या खाली कुठेही मजूर मिळत नाही. सगळ्या शेतमजुराची ही जी काही उन्नती झाली आहे,त्याचं श्रेय्य एकट्या शेतकरी संघटनेकडे आहे, हे मी तुम्हाला सांगतो.पण वीज नाही, औषध खत नाही, खत घ्यायला गेलं तरी ते सुद्धा विकत मिळत नाही. मजुरीचा दर १५० रुपयाच्यावर, शेती कशी करायची? हा मोठा गंभीर प्रश्न सगळ्या शेतकर्यांसमोर आहे. निर्यातीच्या बंधनामुळे कापसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, उसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, आणि हे सगळं असतांना सभेच्या दोन–अडीच तासापैकी दिड तास केवळ सत्कारावरती वापरला गेला, याच्या बद्दल मी तुमची सगळ्यांच्या वतीने क्षमा मागतो. माझ्या सहकार्यांनी सत्काराचा एवढा घाट घातला, त्याची भावनाही थोडी मी समजून घेतो,थोडी तुम्ही समजून घ्या. यांनी माझ्याबरोबर गेली २५ वर्ष काम केलं आहे, माझ्याबरोबर ते तुरुंगात गेले आहे, घरादाराचा कधीही विचार केला नाही, शरद जोशींनी हाक दिली की घर सोडून ते पिसाटासारखे बाहेर आले आहेत. त्यांच्या माझ्याविषयी काही व्यक्तिगत भावना आहेत, आणि मी त्यांना कितीही सांगीतलं, कोणत्याही प्रकारचा सत्कार करू नये, तरी त्यांची अशी बुद्धी होते की, आपल्या भावनेला कुठेतरी वाचा फ़ुटली पाहीजे, म्हणून त्यांच्या हस्ते ही आगळीक घडली, त्यांना आपण क्षमा करावी, मी त्यांना क्षमा केली आहे.
हिंदुस्थानतल्या सगळ्या शेतकर्यांसमोर वेगळे-वेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांचे जे प्रश्न सांगीतले त्या प्रश्नामध्ये वीज तोडण्याचा प्रश्न, धानाचा भावाचा प्रश्न, कपाशीच्या भावाचा प्रश्न व उसाच्या भावाचे प्रश्न सांगीतले. आम्ही आताच किसान समन्वय समितीची भली मोठी एक दिवसभराची बैठक घेतली, तिच्या मध्ये आणखी काही वेगळे प्रश्न आले आणि अद्यापपर्यंत या सगळ्या सभेमध्ये कोणीही न मांडलेला मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो. कदाचित तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं नसेल. जे शेतकरी संघटक वाचतात त्यांना त्याचा थोडाफ़ार अंदाज असेल. पण काही वर्षापुर्वी, ४० ते ५० वर्षापुर्वी भारत सरकारने आणि राज्य सरकारने, सगळ्या शेतकर्यांच्या जमिनीवरती सिलींग लादण्याचा कायदा केला होता, ते तुम्हाला आठवत असेल, १८ एकर आणि ५४ एकर. आता केंद्र सरकार एक नवीन कायदा करित आहे आणि त्या कायद्यामध्ये आता १८ एकर नाही, ५४ एकर नाही, जास्तीत जास्त जमीनधारणा ही बागायती क्षेत्राकरीता २ एकराची आणि कोरडवाहू क्षेत्राकरीता फ़क्त ५ एकराची असणार आहे. हे दोन आकडे तुम्ही लिहून घ्या. मनाशी विचार करा की, ज्या लोकांनी तुम्हाला खर्या शेतकर्याचे नेते आपणच आहोत, म्हणून गावोगाव पोस्टर लावली, तेच लोक आता शेतकर्याला २ एकरापेक्षा जास्त एकर जमीनधारणा करता येऊ नये, अशा तर्हेचा कायदा आणणार आहे.
पंडीत जवाहर नेहरू जिवंत असताना एकदा त्यांनी असा प्रयत्न केला होता. आणि ज्या पक्षाचा वारसदार स्वतंत्र भारत पक्ष आहे, त्या स्वतंत्र पक्षाने आणि चक्रवर्ती राजगोपालाचारींनी नागपूर कॉंग्रेसमध्ये त्यांचा बेत हाणून पाडला होता. तुमच्या शेतीवरती जी संकटे येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं,सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल तर पुन्हा एकदा दुसर्यांदा येणारा हा जमीन धारणाकायदा असणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला आज जी काही लढाई करायची असेल ती करा, धानाकरीता करा, उसाकरीता करा, कापसाकरीता करा, पण उद्या तुमची जमीनच राहिली नाहीतर तुम्ही शेतकरीच कसे राहणार? तेव्हा मुख्य जी तुमची ताकत लावायची आहे ती शेतकर्याच्या जमीनीचं राष्ट्रीयीकरण होऊ नये, शेतकर्याला जमीन ठेवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याची वासलात लावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याच्याकरीता आपल्याला लढाई द्यावी लागणार आहे आणि मी देखील आता इथे झालेली पुष्कळशी भाषणं ऐकली, तरूण मंडळींनी मोठ्या जोषात भाषणं केलीत, मी तुम्हाला सांगणार आहे की, शेतकरी संघटनेने कधीही त्वेषपूर्ण व जोषपूर्ण भाषणांवर विश्वास ठेवला नाही.
शेतीच्या परिस्थितीचा शांतपणे विचार करावा, हिशेब मांडावेत, आपलं काय चुकत आहे याचा हिशेब मांडावा, पिक काढण्याकरिता आपल्याला काय खर्च येतो आणि आपल्याला मिळतं काय? याचाही हिशेब मांडावा, आणि असा शांत डोक्याने हिशेब मांडून मग काय आंदोलन करावं त्याचं अर्थशास्त्र मांडावं, हा शेतकरी संघटनेनी गेली २५-३० वर्ष तुम्हाला दिलेला संदेश आहे. गेली २५-३० वर्ष सतत शेतकरी संघटनेनी केलेली भाकितं खरी ठरली. ते आता उस कारखाण्याविषयी बोलत आहे. पण उस कारखाने सगळी बुडणार आहेत, हे भाकित शेतकरी संघटनेने २५ वर्षापुर्वी केलं. कापूस एकाधिकार हा शेतकर्यांच्या शोषणाचं षडयंत्र आहे, हे कापूस एकाधिकार बंद झाला पाहिजे ही मागणी शेतकरी संघटनेने केली होती. मी काही जोतिषी नाही, मी काही भविष्यवेत्ता नाही आणि तरीही माझ्या तोंडून निघालेली ही भाकितं २५-२५ वर्षांनी का होईना,पण १०० टक्के खरी ठरतात. याचं कारण असं की आम्ही मनामध्ये कोणत्याही तर्हेचा राग द्वेष येऊ न देता, प्राप्त परिस्थितीचा शांतपणे विचार केला आणि शांतपणे विचार करून मार्ग काढला. आणि म्हणून जे राजस्थानातल्या प्रतापसिंहाना जमले नाही, जे हरयानातल्या जाटांना सुद्धा जमले नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे महाराष्ट्रात करून दाखविले. कारण गनिमी काव्याची लढाई आणि शांत डोक्याची लढाई महत्वाची असते.
मी तुम्हाला पहिल्यांदा एक सल्ला देणार आहे की सगळी भाषणे झाली, कृतीमध्ये आपण कोठे कमी पडणार नाही, पण कृती करताना आणि जहाल कृती करताना सुद्धा डोक्याची शांती कधीही घालवू नका, आपल्याला आंदोलन करताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती ही की, सरकार म्हणतं की सगळ्यांना खायला मिळालं पाहिजे, अन्नधान्य अधिक पिकवा, पण त्याच्यामध्ये एक मंत्री बेमुर्वतखोरपणे म्हणतो की, आम्ही तुमची वीज कापणार आहो, आणि वीज कापण्याकरीता तुमच्या गावात सुद्धा कोणी मनुष्य येणार नाही. का? आमच्या वीज कंपनीचा कोणी मनुष्य गावातली वीज कापायला आला तर तुमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्याच्या विजेच्या खांबावरती तो चढला म्हणजे त्याच्या खालती त्या आग लावून देतात. म्हणून तुमच्या गावात आम्ही कोणाला पाठवणार नाही. आम्ही काय करणार? तालूक्याच्या गावी किंवा त्याच्या पलिकडे जिथे आमचा ट्रांन्सफ़ार्मर आहे, ते आम्ही ट्रांन्सफ़ार्मर काढून नेणार, तुमच्या गावात यायला नको, तुमची वीज आम्ही तोडतो. याला वाटतं आपण खूपचं शहाणपण आणि युक्ती वापरली. आपण गनिमीकावा केला पण या गनिमीकाव्यापेक्षा सरस गनिमीकावा शेतकरी संघटनेकडे आहे. तू वीज कोणती कापणार? जी वीज तुझ्या साठ्यात राहील तीच ना? पण त्या साठ्यातली वीज येते कुठून? ती वीज येते आमच्या विदर्भातून. मघाशी जी जी भाषणं झाली वामनरावांनी भाषण केलं, रवि देवांगनी भाषण केलं. मी त्यांना सांगतो, तुम्हाला माझं वय ७५ झालं काय, १०० झालं काय, याचं काहीच देणंघेणं नाही. परंतू जर का तुमची वीज कापण्याकरीता तालुक्याच्या पातळीवरून ट्रांन्सफ़ार्मर हलवणारा तो शेतकर्याचा मुलगा आहे की नाही, मला शंका आहे. जर का कोणी असं करायला लागला तर ज्या मिळेल त्या मार्गाने विदर्भातली वीज महाराष्ट्रात जाणार नाही, याची जमेल त्या मार्गाने काळजी घ्या. कोणताही मार्ग वापरा. पण एवढ्याने लढाई संपणार नाही. तुम्ही धान्य वाढवावं, पिक वाढवावं, असं सरकारला वाटतं. पण तुम्हाला वीज मात्र मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, खतं मिळणार नाही, औषध मिळणार नाही, अशा तर्हेने सगळ्या शेतकर्यांना कोंडीत घालण्याचा प्रयत्न चाललाय. वीज नाही, औषध नाही, खतं नाही, बियाणही मिळणं कठीण आहे. एवढंच नव्हे तर तुमची जमीन सुद्धा फ़क्त २ एकर तुमच्याकडे राहील. मघाशी एक मुद्दा मी सांगायचा विसरलो, तो पुन्हा सांगतो, त्या कायद्यामध्ये तरतुद आहे की आता आम्ही हे जे नवीन नियम ठरवले. २ एकराचा आणि ५ एकराचा. ४० वर्षापुर्वी १८ एकर आणि ५४ एकर ठरलं. पण या कायद्याचा अमंल आता आम्ही ४० वर्षापुर्वीपासून घेणार आहोत. म्हणजे ४० वर्षापुर्वी तुमची जमीन किती होती? त्यावेळी जर का तुमच्याकडे जमीन जर समजा १०० एकर असेल, त्याच्यातली तुमच्याकडे १८ एकर राहीली. ८२ एकर त्यांनी काढून घेतली. आता तुमच्याकडे जी जमीन उरली त्याचा हिशेब लक्षात घेता, तुमच्याकडे फ़क्त २ एकर ठेवून ९८ एकर जमीन तुमच्याकडून काढून घ्यायची आहे. आणि याचा अर्थ असा की तुमच्याकडे आता जर जमीन राहीली नसेल, ही जी १८ एकर होती त्यापैकी सुद्धा काही जमीन तुम्ही काही विकून टाकली असेल तर काय करायचं? जुन्या काळी लेव्हीची व्यवस्था होती आणि तुमच्याकडनं ज्वारीची पोती घेऊन जायला सरकारी अधिकारी यायचे आणि तुमच्या घरी जर का लेव्ही घालायला ज्वारी नसली तर तुम्ही बाजारातून ज्वारी महागात विकत आणायची आणि ती स्वस्त भावात लेव्ही घालायची. हा मुर्खपणा तुम्ही केलाय ना? सरकारचं म्हणणं आहे की आता तुम्ही तेच करा. तुमच्याकडनं आम्ही जमीन काढून घेणार आहोत तेंव्हा त्याच्याकरिता पाहिजे तर बाजारातून नवीन जमीन विकत घ्या आणि आम्हाला द्या. ही केवढी भयानक गोष्ट आहे? याचा फ़क्त तुम्ही विचार करा. या परिस्थितीमध्ये आपल्याला डोकं शांत ठेवून शेती करायची आहे आणि मी तुम्हाला अशी विनंती करतो की, ह्या करीता काही शिस्त शिकावी लागेल. ही कल्पना मी काही पहिल्यांदा मांडतो आहे असे नाही. परभणीच्या अधिवेशनात मी मांडली होती. आम्ही वाटेल तितकं पिकवू. आणि त्या सगळ्या पिकाला आम्ही मागू तो भाव मिळाला पाहिजे, हे जगामध्ये शक्य नाही. कोणत्याही बाजारपेठे मध्ये हे शक्य नाही. ज्याला आपल्या पिकाचा भाव मिळवायचा आहे त्याला पिकाचं नियंत्रण करायला पाहिजे. तुमच्या घरची पोरं जशी हुशार व्हावी तर कुटूंबनियोजन केलं पाहिजे. तसं पीक नियोजन केल्याशिवाय तुम्हाला आता गत्यंतर नाही. कुटूंबनियोजनासारखं “हम दो, हमारे दो” सारखं आता आपल्याला पीक नियोजन करावं लागेल. आणि सोपी गोष्ट. मी जेंव्हा शेतकरी संघटनेचं काम चालू केलं तेंव्हा मला आठवतं की आमच्या एक कार्यकर्त्या शैलाताई देशपांडे, माहेरघर शहरातलं, लग्न झालं शेतकर्याच्या घरी. आणि त्या म्हणाल्या की पहिल्यांदा मला असं आश्चर्य वाटलं की, शेतकर्याच्या घरी खूप धान्य असतं पण शेतकर्याच्या घरी मात्र खातांना मातेरं धान्य घरी खायचं आण चांगलं धान्य असेल ते विकायचं. हे शेतकर्याच्या घरी का असते, हे मला कळेना. हे मला अनेकवेळा सांगितलं. आजपर्यंत आपण शेतकर्याने घरच्या लोकांना मातेरं खाऊ घातलं आणि चांगलं-चांगलं निवडक धान्य, चांगला-चांगला निवडक भाजीपाला, चांगलं-चांगलं दूध बाहेर विकलं. मी तुम्हाला सल्ला देणार आहे. तो सल्ला असा की, याच्यापुढे पहिल्यांदा कमी पिकवा, कमी पिकविण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाजारामध्ये जाणे बंद करा. बाजारामध्ये खतबीत विकत घ्यायला जाऊ नका. आणि तुमचा मालही विकायलाही जाऊ नका. तुमच्याघरचे दूध तुमच्या पोराबाळांना पाजा. चांगलं अन्नधान्य, सकस जैविक पद्धतीने पिकविलेलं अन्नधान्य आपल्या पोरांना खाऊ घाला. याच्यापुढे त्यांना मातेर्यावर वाढवू नका. आणि जर का तुमच्याकडे अजून बाकी आणखी काही पिकवावं वाटलं, की नुसती एवढी ज्वारी पिकवून आमचं भागणार नाही, तर चांगली ज्वारी फ़क्त तुमच्या कुटूंबापुरती पिकवा. आणि मग जी काही बेकार ज्वारी, रासायनिक खत वगैरे वापरून हायब्रिड ज्वारी पिकवाल ना? त्याच्यासाठी मी एक चांगली युक्ती सांगतो. ती सगळी ज्वारी सुद्धा देशातल्या लोकांना आपण खाया करिता द्यायची नाही. त्या ज्वारीची वासलात मी लावणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून नावं मागविणार आहे. ही सभा झाल्याबरोबर तुम्ही माझ्याकडे नावं पाठवायची आहे. आणि मी त्या विद्यार्थ्यांना,शेतकर्यांना तुमच्या ज्वारीपासून, तुमच्या मक्यापासून तुमच्या भातातून, औरंगाबादला अधिवेशनात आपण जो अभ्यास केला त्याप्रमाणे इथेनॉल किंवा बायोडिझेल, त्याची किंमत आज बाजारात ५५ रुपये लिटर आहे. ते तयार कसं तयार करायचं ही विद्या मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जर का गचाळ माल तयार करायचा आणि तो लोकांना खायला द्यायचा नाही, या मालाचा आपण पेट्रोल-डिझेल करायचे आहे. आणि चांगल्यापैकी पैसे कमवायचे आहे. आणि चांगलं धान्य मग आपल्या घरी घरच्यांना खाऊ घालायचे आहे. मला एकदा बघायचंच आहे की अजित पवार आणि शरद पवाराचे बच्चे किती वर्ष तग धरतात ते मला एकदा बघायचे आहे. चांगलं पिकवा, सकस अन्नधान्य आपल्या मुलांबायकांना खाऊ घाला आणि बेकार अन्न आपल्याला हरितक्रांतीच्या नावाने हरितक्रांतीच्या नावाने शिकवलं ना? त्याची वासलात लावायची माझ्याकडे सोपी युक्ती आहे. त्याचा आपण पेट्रोल-डिझेल बनवू या आणि जास्त पैसे कमवू या. पण या हरामखोर सरकारला हे धान्य आपण कोणत्याही किंमतीत देणार नाही.
यापलिकडे आणखी काही महत्वाच्या गोष्टी मला आपल्याला इथे शेगावला सांगायच्या आहेत. गजानन महाराजांच्या या तिर्थ क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्य आहे. काहीतरी गजानन महाराजांच्या पुण्याईचा हा भाग आहे. अनेकवेळा लोक मला म्हणतात की हे गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हे काय वाक्य म्हटलं हो? बोना याचा हिंदीत अर्थ म्हणजे पेरणे. “गण गण गणात बोते” याचा अर्थ असा आहे की सर्वांनी जाऊन लोकालोकांमध्ये आपला विचार पेरावा. तुम्ही हा “गण गण गणात बोते” हा मंत्र येथून घेऊन जा आणि तुमच्या सबंध जीवनामध्ये आणि शेतकर्यामध्ये काय क्रांती होते ते बघा. १९८० सालापासून आपण शेतकर्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि ती मान्य झाली. १९९१ साली पी नरसिंहराव पंतप्रधान होते आणि सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंह तेंव्हाचे अर्थमंत्री होते. तेंव्हा खुल्या व्यवस्थेची घोषणा झाली होती. तेंव्हा आपण याच गजानन महाराजांच्या शेगावात, याच मैदानात जमलो होतो. आणि चतुरंग शेतीचा आदेश आपण दिला होता.
योगायोग आहे, की आज वीस वर्षांनी पुन्हा याच नगरीत आपण जमलो आहोत, मी त्या वेळेसारखा तरूण राहीलो नाही. ती सभा झाल्यानंतर चतुरंग शेतीचा कार्यक्रम आपण फ़ार जोमाने राबविला होता. आज मी एका वेगळया पायरीवर आलो. मी कधीही कोणत्याही आदोंलनामध्ये तुम्हाला अशी गोष्ट करायला सांगीतली नाही की जी मी करायला तयार नव्ह्तो. तुम्हाला कधीही मी जीव धोक्यात घालायला सांगीतले नाही,माझा जीव धोक्यात घातल्याखेरीज. कांद्याच आंदोलन असो, उसाचं आंदोलन असो, आमरण उपोषण करण्याचा धोका मी घेतला. रस्ता बंद करायचा झाला तर रस्त्यावरती किंवा रेल्वेवरती जाऊन बसायचं काम मी केलं. वीज तोडण्याच्या आदोंलनामध्ये S.R.P ची नजर चुकवित पटकन उडी मारून नाहीसे होणे, हे करण्याची शक्ती सुद्धा एकेकाळी माझ्यात होती. आज दुर्दैवाने ती नाही. शंभर वर्षे मी जगावं अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची खरी इच्छा असेल ना, तर शंभर वर्षे मी जगावं ही सोपी गोष्ट आहे.
मी या जिवंतपणी “देखता डोळा” हिंदुस्थानातला सगळा शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहीन, अशी मी प्रतीज्ञा केली आहे. तुम्ही अशी लढाई करा की त्यामुळे मला “ह्या डोळा, देवा देखता” हिंदुस्थानातला शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहू द्या. शंभर नाही, महात्मा गांधीच्या वर एकशे वीस वर्ष मी जगून दाखवतो. पण ही अट आहे की या म्हातार्याचं स्वप्न तुम्ही पुर्ण करा आणि त्याच्या मुळे मला प्रचंड चेतना मिळाणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करा. आता इथे कल्पना मांडली आमच्या युवा संघटनेच्या नेत्याने. निर्यातीची बंधने उठवण्याकरिता काय काय करावं लागेल, त्या करीता या शेगावच्या बैठकीत मी काय काय बदल केला? वीस वर्षा पुर्वीच्या शेतकरी मेळाव्यामध्ये मी चतुरंग शेतीचा कार्यक्रम दिला होता. माजघर शेती, निर्यात शेती, व्यापार शेती आणि सीता शेती, असा चतुरंग कार्यक्रम दिला होता. या चार आकडयाचं काहीतरी मह्त्व आहे. मी या बैठकीमध्ये चार सेनापती इथे नेमलेले आहेत. हे चारही सेनापती तरूण पिढीतील असल्यामुळे मला जे काही करणे शक्य नाही ते त्यांना करता येईल. यापुढे शेतकरी संघटना चालविण्याचे आणि त्याचे आंदोलन चालवण्याचे सर्वाधिकार मी चार लोकांकडे दिले आहेत. त्यांचे नाव मी इथे जाहीर करणार नाही, ते अशाकरिता की जर त्यांची नावे जाहीर केली तर त्यांना इथेच अटक करतील, घरी पोचायचे नाहीत. मला तसं करायचं नाही. हे युद्ध गनिमीकाव्याचे आहे. पण आता इथं अनिल धनवट, आमचे युवा नेते, त्यांनी एक शिफ़ारस केली की आज सुद्धा इथे वेळ नाही, वेळ थांबु शकत नाही, जीव घाबरा होत आहे, एकदा आमचे श्वास मोकळे होऊ द्या आणि जितक्या लवकर शक्य होईल तितकं असं काहीतरी करण्याचा आदेश द्या की ज्यामुळे शेतकरी संघटना ही जिवंत आहे किंवा मृत आहे अशी शंका असणार्यांच्या डोळ्यात अंजन पडेल आणि शेतकरी संघटनेची प्रचंड ताकत पुन्हा एकदा जगाला दिसेल. सर्वसाधारणपणे शेतकरी संघटनेने नवीन आदोंलनाचा आदेश दिला म्हणजे मी विचारतो की कोण यायला तयार आहे. कितीजन तुरुंगात यायला तयार आहे. मी यावेळी हा प्रश्न नाही विचारणार. मी तुम्हाला वेगळ्या तर्हेने मतदान करायला संगणार आहे. आपण लोकशाही मार्गाने जाणारे आहोत. रावेरीला जेव्हा महीला अधिवेशन झालं तेव्हा कपाशीचा प्रश्न अत्यंत बिकट झाला होता आणि कापूस खरेदी होत नव्हती तेव्हा आपण रावेरी अधिवेशन संपल्या संपल्या, सगळ्या अधिवेशनाची लाखोंची संख्या घेऊन रेल्वे लाईनवर आणि रस्त्यावरती बसलो होतो. तो इतीहास पुन्हा एकदा घडवण्याचं मी ठरवलं आहे. आणि अनिलच्या विनंतीप्रमाने या सगळ्या सभेला मी विनंती करतो की, ही सभा संपल्यानंतर या सगळ्या सभेतील बायकांनी,पुरुषांनी,मुलांनी जवळ जो रस्ता तुम्हाला दाखवला जाईल, शेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ जे फ़ाटक आहे तेथे जाऊन आपण सगळ्यांनी रेल्वे अडवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महिला जातील आणि त्यांना शिस्तीत पहिल्यांदा पुढे जाऊ दिल्यानंतर मग पुरुषांनी तेथे जायचे आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम संपल्याचा आदेश होत नाही, तोपर्यंत तेथे अत्यंत शांतपणे, कोणत्याही तर्हेचा दंगाधोपा, नासधूस न करता, आपल्या नेहमीच्या शिस्तीने तुम्ही जर का हा कार्यक्रम राबवून दाखवला तर मी असे म्हणेन की मी तुमच्या समोर ज्या कल्पना मांडल्या, की वीज नाही, पेट्रोल नाही, श्रमशक्ती नाही या परिस्थितीमध्ये आपण पीक नियोजनाच्या हत्याराने लढणार आहोत. आणि आवश्यक पडलं तर त्याच्याकरिता आमची जुनी शमिच्या झाडावर ठेवलेली हत्यारे उपसायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. हे जर तुम्ही दाखवून दिलं तर मी असं समजेन, की तुमची खरोखर इच्छा आहे की, ७५ वर्षे मी तुमची सेवा केली, आणखी २५ वर्षे करावी. याचा पुरावा आज संध्याकाळच्या आत मला दाखवायचा आहे, एवढे बोलतो आणि आपली रजा घेतो
शब्दांकन – गंगाधर मुटे ................................................................................................................. शेगावच्या महामेळाव्यात दि. १०-११-२०१० रोजी मा. शरद जोशींनी केलेले भाषण. ऐकण्यासाठी क्लिक करा.
"रात्रंदिवस काबाडकष्ट करूनही शेतकरी कायमच कर्जबाजारी का राहातो, त्याला सन्मानाचे जीवन का जगता येत नाही, याचा शेतकरी नवयुवकांनी शोध घेऊन उत्तर शोधावे" असे आवाहन शेतकरी संघटनेचे बळीराज्य विदर्भप्रदेश अध्यक्ष जगदिश बोंडे यांनी केले. स्थानिक शिवसुमन सभागृहात संपन्न झालेल्या शेतकरी युवक मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, १९७२ साली एक क्विंटल कापसाच्या किंमतीत १० ग्रॅम सोने व्हायचे, त्यानंतर शेतीमालाच्या तुलनेत अन्य वस्तुचे भाव प्रचंड वाढले. त्यामुळे कापूस शेतीच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या तफ़ावतीमुळे कापूस शेतीचा व्यवसाय तोट्याचा झाला आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे यंदा कापसाला चांगले भाव मिळण्याची शक्यता असूनही जर केंद्र शासनाने निर्यातबंदी लादली तर कापसाचे भाव कोसळणार आहेत. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आता शेतकरी युवकांनी कंबर कसली पाहीजे.
मेळव्याला युवा आघाडीचे विदर्भाध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, माजी आमदार सरोज काशीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, प्रा.मधुकर झोटींग, प्रा.पांडुरंग भालशंकर, जि.प. सदस्य रेखा हरणे यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे संचालन सचिन डाफ़े यांनी तर आभारप्रदर्शन दत्ता राऊत यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी साहेबराव येडे, उल्हास कोटंबकर, जीवन गुरनुले, संतोष लाखे, शरद सावंकार, पुंडलिक हूडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
ऑक्टोबरला संपन्न झालेल्या रावेरी येथिल महिला मेळाव्यात शेतकरी संघटनेने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हा कचेरीच्या बाजूला म. गांधी पुतळ्यासमोर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!” असा खणखणीत इशारा देण्यात आला. सभेत बोलतांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले की,या वर्षी अतीवृष्टीमुळे पाकिस्तान व चीन या देशातील कापूस पीक बहूतांशी नष्ट झाले आहे.तसेच अमेरिकेत सुद्धा तिथला कापूस उत्पादक शेतकरी मका व इतर पिकांकडे वळला आहे. भारतात सुद्धा महाराष्ट्र व गुजरातमध्ये अतिपावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कापसाला चांगले भाव मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
परंतू देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्यासाठी शासनावर मिलमालकांकडून दबाव येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणण्याचे छडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहे. तो सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला.
या इशारा आंदोलनाला माजी जिल्हाध्यक्ष निळकंठराव घवघवे,नंदकिशोर काळे,पांडुरंग भालशंकर,जीवन गुरनुले,उल्हास कोटंबकर यांनी संबोधित केले.
या इशारा आंदोलनाला युवक आघाडीप्रमुख सचिन डाफ़े,दत्ता राऊत,डॉ. महाकाळकर,बाबाराव दिवानजी,प्रभाकर झाडे,रामभाऊ तुळणकर,अरविंद बोरकर,रविंद्र खोडे,किसना वरघने,रमेश बोबडे,देविदास मुजबैले,विजय राठी,डॉ. अनिल पोफ़ळे,मंसाराम कोल्हे,दमडू मडावी,सुनिल लुंगसे,धोंडबा गावंडे तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.