Thursday, November 11, 2010

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको


                  दि. १० नोव्हेंबर २०१० रोजी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी संघटनेचा संतनगरी शेगावात स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शेतकरी महामेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हे होते. मंचावर माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, दिनेश शर्मा, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, हरीयाणाचे गुणीप्रकाश, कर्नाटकचे हेमंतकुमार, दिलीप भोयर, अनंत उमरीकर, सम्राट डोंगरदिवे, संजय कोले, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष नामदेवराव जाधव, रमेशसिंह राजपूत आदी उपस्थित होते. 
                मेळाव्यात प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'माझा बाप शेतकरी' या कवितांची सीडी प्रकाशित करण्यात आली तसेच शरद जोशी यांच्या 'भारतासाठी' व 'पोशिद्याची लोकशाही' या दोन पुस्तकाचे तर कवी गंगाधर मुटे यांच्या 'रानमेवा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन शरद जोशींच्या हस्ते करण्यात आले. रावेरी येथे सिता मंदिराचे बांधकाम करणाऱ्या रमेश पाटील यांचा यावेळी शरद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद जोशी यांना यावेळी कृतज्ञता निधी वामनराव चटप, कैलास पवार, रवि देवांग यांच्या हस्ते देण्यात आला.

शरद जोशी यांना कवितेचे सन्मानपत्र 

             शरद जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेच्या ओळी चांदीच्या तबकावर कोरून ते मानपत्र प्रदान करण्यात आले. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होई पर्यंत कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणा केली होती मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जाणून मी हे सन्मानपत्र स्वीकारले असे जोशी यांनी स्पष्ट केले. मी शंभर वर्ष जगावे असे वाटत असेल तर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होण्याची लढाई जोमाने लढा माझ्यासाठी हीच उर्जा ठरेल असे भावनिक उदगार त्यांनी काढले. हे सन्मानपत्र जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ अप्पा बुरघाटे, बापुमामा थिटे, द्वारकाबाई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शरद जोशींनी आपल्या भाषणात धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.
*  *   *   *   *


"अमरावती-भुसावळ पॅसेंजर अडवितांना ठीय्या देऊन बसलेले शेतकरी.

................
"राज्यपालांना सादर करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करताना रविभाऊ देवांग व अ‍ॅड वामनराव चटप.
...............

..............
शेगाव रेल्वेरोको आंदोलन
...........
राज्यपालांमार्फ़त त्यांचे अप्पर सचिव दे.च.खाडे व स्विय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्या नेत्यांशी चर्चा केली. शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात शेतकरी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले जाईल असे लेखी पत्र राज्यपालांमार्फ़त देण्यात आल्याने तीन तास चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
........................

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून

आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे